(मुंबई)
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात राडा झाला आहे. शिवाजी पार्कवरच्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळासमोरच शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर आले होते. बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करून मुख्यमंत्री तिथून गेले, यानंतर दोन्ही गटांचे कार्यकर्ते भिडले.
मुख्यमंत्री शिंदे स्मृतीथळावरून निघून गेल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांचे स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान शिंदे गटाने अनेक कार्यकर्ते स्मृतीस्थळी उपस्थित होते. त्यामुळेच ठाकरे आणि शिंदे गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली.
आज 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा 10 वा स्मृतीदिन आहे. या स्मृतीदिनाच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीथळाला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेबांना अभिवादन करून त्यांना आदरांजली दिली. यानंतर मुख्यमंत्री शिंदे निघून गेले होते. यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि अनिल देसाई यांच्या नेतृत्वात काही कार्यकर्ते शिवाजी पार्कवर दाखल झाले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ ठाकरे गटाकडून गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न झाला. ठाकरे गटाचा हा प्रयत्न शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून हाणून पाडण्याचाही प्रयत्न झाला. या प्रयत्नात बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यामध्ये जोरदार राडा झाला.
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळासमोरच दोन्ही गट भिडले होते. यावेळी दोन्ही गट एकमेकांना धक्काबुक्की करत होते. या दरम्यान स्मृतीस्थळाचे रॉडही तुटले गेले. दोन्ही गट एकमेंकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. हाकलून द्या, हाकलून द्या, गद्दारांना हाकलून द्या, अशा घोषणा ठाकरे गट करत होता. यावेळी शिवाजी पार्कवर तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी कोणताही वाद नको, गालबोट लागायला नको म्हणून सामंजसपणाची भूमीका घेत मुख्यमंत्री पूर्वसंध्येला दर्शन घ्यायला जातात. त्यामुळे आज ठाकरे गटाने तिथे दाखल होऊन वाद घालण्याची कोणतीही गरज नव्हती.परंतु, बाळासाहेबांना आपण गमावलंय या भीतीपोटी ते कोणत्याही थराला जात आहेत. स्मृतिदिनी विनाकारण अशांतता निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न हा निंदनीय असून त्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते, त्यांनी स्मृतीस्थळाला वंदन केलं. चुकीच्या पद्धतीने घोषणा देणं सहन करणार नाही, अंगावर आले तर शिंगावर घ्यायची तयारी आहे. उरलेले शिल्लक किती आहेत? बाळासाहेबांचे संस्कार विसरले, हिंदुत्व खुंटीला टांगलं. जर मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरले तर सहन करणार नाही’, असा इशारा शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिला आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे म्हणाले, की दुर्दैवी घटना आहे, जी गद्दार गँग आहे, जे घाबरलेले आहेत, जे बाप चोर आहेत, जे पक्ष चोरणारे लोक आहेत, जे गुवाहाटी आणि गुजरातला पळून गेले यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा काहीही अधिकार नाही. त्यांचा फोटो वापरून, पक्ष वापरून, नाव वापरून स्वत:साठी राजकारण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.