(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज धक्कातंत्राचा वापर करत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार आता शिंदे सरकारमध्ये सामील झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम,संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
शरद पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांची नावे
रोहित पवार
जयंत पाटील
जितेंद्र आव्हाड
अनिल देशमुख
सुमनताई पाटील
बाळासाहेब पाटील- कराड
शरद पवारांनी आम्हाला काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की, 2024 ला पंतप्रधान मोदी हेच देशाचे नेतृत्व करणार आहे, तेच पंतप्रधान म्हणून येणार आहे. आता जर असं आहे तर त्यामुळे एक सकारात्मक विचार घेऊन त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला पाहिजे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला मदत केली पाहिजे. उगाच रस्त्यावर भांडण करून काही फायदा नाही, असं विधान मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिलं आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच आम्ही सामील झालो आहे. यावर मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. राज्याचे हित लक्षात घेऊन वविकास कामे करायची असतील तर एकत्र येऊन कामे केली पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात मजबुतीने काम करत आहेत. ते विकासाच्या कामात ताबडतोब निर्णय घेतात. तसेच यावेळी देशामध्ये मोदीच येणार, अस चार दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी आम्हाला सांगितलं होते, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला असा मोठा गौप्यस्फोट भुजबळांनी केला आहे.
ईडी कारवाईमुळे सरकारमध्ये सामील झाल्याच्या आरोपावर भुजबळ म्हणाले, आमच्यावर केसेस आहे म्हणून आम्ही गेलो, असं नाही. अजित पवारांवरील खटले निकाली निघाले आहेत. माझ्यावर ज्या केसेस आहेत, त्यातील महत्त्वाची केस सोडली आहे. पण, अनिल यांच्यावर, अदिती तटकरे यांच्यावर तर केस नाही. संजय बनसोडेही स्वच्छ आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर केस आहे, त्यांच्यावर आरोप झाले आहेत. कारवाई केली नाही. त्यांच्याविरोधात पुरावे नाहीत, कोर्टानेही कारवाई पुढे नेली आहे. आम्ही आता सरकारमध्ये राहुन जनतेचे काम करणार आहोत, असंही भुजबळ यांनी सांगितलं.
अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्याजागी राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांची मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्ष नेतेपदी करण्यात आली आहे. मी मेलो तरी पवारांना सोडणार नाही, राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार यांच्याकडेच असणार असून पक्ष आणि चिन्ह कोणीही घेऊ शकणार नाही. अवघड परिस्थितीमध्ये संधी म्हणून पाहणार आहे. शरद पवार अजून अॅक्टिव झाले नाहीत थोडं थांबा, असं सूचक वक्तव्यही जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
पक्षातील सर्व आमदारांना माझाच व्हिप लागू होणार. मी शरद पवारांना सोडून कुठेही गेलो नसतो. शरद पवारांनी इतकी पदं देऊन सुद्धा वेगळी भूमिका घेतली. सरकारसोबत जाण्यासाठी मला कोणीही विचारलं नाही. मी मेलो तरी शरद पवारांची साथ सोडणार नाही. जे आमदार सोडून गेले त्यांच्या मतदारसंघात संताप व्यक्त केला जातोय. 6 तारखेच्या बैठकीत आमदारांनी चर्चा करायला हवी होती. पक्ष आणि चिन्ह कोणीही घेऊ शकत नाही. शरद पवारांना अशा परिस्थितीत आणणं ही वाईट गोष्ट आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.