( रत्नागिरी / प्रतिनिधी )
कोकणातील आवडता उत्सव म्हणजे गणेशोत्सव. मात्र या गणेशोत्सवात कोकणवासियांना यावर्षी मूर्तींच्या उंची आणि किंमतीत मुरड घालावी लागणार आहे. वाढत्या महागाईची झळ यावर्षी गणेशमूर्तींनाही बसणार आहे. यावर्षी गणपती लवकर येत आहेत. 31 ऑगस्टला बाप्पांचे आगमन होणार आहे. गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये मोठी लबगब पहायला मिळत आहे. शाडू मातीच्या किंमतीत वाढ झाली आहे. तसेच रंगकामाचे वाढलेले दर, कलाकारांचे मजुरीचे वाढलेले दर यामुळे गणेशमूर्तींच्या किंमतीत वाढ होणार आहे.
गणेशमूर्ती कारखान्यात मूर्ती रेखाटणार्या कामगारांना रोजंदारी द्यावी लागते. ही रोजंदारी प्रतिदिन 600 ते 700 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. रोजंदारीसह साहित्याच्या खर्चांत वाढ झाली आहे. शाडूची मूर्ती बनवण्यासाठी लागणारी माती ही अन्य राज्यातून आणावी लागते. त्याचा वाहतुकीवर परिणाम होतो. तसेच इंधनाचे दरही वाढले आहेत. परिणामी गणेशमूर्तींच्या किंमतीत वाढ करावी लागते असे मूर्तीकाराने सांगितले.
पीओपीच्या मूर्ती बनवू नयेत अशी वारंवार पर्यावरण प्रेमींकडून मागणी केली जात आहे. पीओपीच्या मूर्ती पाण्यामध्ये लवकर विरघळत नसल्यामुळे नदीचे प्रदूषण होते. यामुळे पर्यावरणप्रेमींनी शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवाव्यात अशी मागणी सरकारकडे केली आहे.