(शिर्डी)
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानने हज यात्रेसाठी ३५ कोटी रुपये दिले, मात्र राममंदिरासाठी पैसे दिले नाही, अशा आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. मात्र अशाप्रकारे कुठलाही निधी देण्याची तरतूद नसून साईबाबा संस्थानने ही अफवा असल्याचे म्हटले आहे. तसेच यापुढे शिर्डीतील साई संस्थानची कुणी बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
शिर्डी साई मंदिरात रोजच लाखो लोक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे शिर्डी साई मंदिर परिसरात नेहमीच भाविकांची वर्दळ असते. अनेकदा शिर्डी साईबाबांच्या नावाने सोशल मीडियावर फेक मेसेज व्हायरल होतात. त्यामुळे अनेक गैरसमज पसरल्याचे या आधीही घडले आहे. आता एक नवा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तो असा कि, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात ‘साईबाबा संस्थान हज यात्रेसाठी ३५ कोटी निधी दिला, मात्र राममंदिरासाठी नाही’ अशा आशयाची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.
मात्र शिर्डी साई संस्थानने या पोस्टचे खंडन केले आहे. शिर्डी साईबाबा संस्थानच्या म्हणण्यानुसार, “असा कुठलाही निधी दिला नसून निधी देण्याची तरतूदच नसल्याचे” साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी म्हटले आहे. साईमंदिराला बदनाम करण्याचे हे कारस्थान असून संबंधित समाज माध्यम आणि अपप्रचार करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर शिर्डी ग्रामस्थही आता अशा अपप्रचारामुळे आक्रमक झाले असून आजवर आम्ही संयम ठेवला, मात्र जर असेच सुरु राहिले तर जशास तसे उत्तर देऊ असा इशारा सुजित गोंदकर यांनी दिला आहे.