(मुंबई)
चार राज्यांच्या निवडणूक निकालात चारपैकी तीन राज्यात भाजपने जोरदार विजय मिळवून दोन राज्यातील काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस हरली त्याचं दु:ख असेल पण हे २०२४ चे शुभ संकेत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तीन राज्यात भाजपला यश मिळाल्याने उद्धव ठाकरे यांनी भाजपचं अभिनंदन देखील केलं. तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहनही केलं आहे.
मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांचा ‘सन्मान सोहळा’ पार पडला. या सोहळ्यातील उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी देशातील विविध विषयावर भाष्य केलं. तसेच यावेळी शिंदे गटावर निशाणाही साधला.
निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की,चार राज्यांचे निकाल लागले. निवडणुकीत जिंकले त्यांचं अभिनंदन करतो. देशात लोकशाही टिकावी यासाठी आपण प्रयत्न करतोय. २०२४ साठी प्रजा ठरवेल राजा कोण असेल. हे मतदान ईव्हीएमवर होतं. त्यामुळे काय खरं आणि काय खोटं हे त्यांनाच माहित. पण स्वाभिमानासाठी शिवसेनेचा जन्म झालाय. त्यामुळे जे शिवसेना संपवायला निघाले आहेत, त्यांना आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. महाराष्ट्र-बंगालची ही परंपराच आहे. ही परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस हरली याचं दु:ख आहेच, पण हे २०२४ लोकसभेचे शुभसंकेत आहेत. लोकं एवढी मूर्ख नाहीत. हे लोक लोकसभेसोबत महाराष्ट्राची विधानसभा देखील एकत्र लावू शकतील. पण कितीही वादळं आली तरी परतण्याची ताकद काय असते हे महाराष्ट्र नक्कीच दाखवेल. असा इशाराही उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.