(मुंबई)
महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ९९६ आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत १२०९ आजारांवर उपचार देण्यात येतात. मात्र या दोन्ही योजनांमधील सुमारे दीडशे आजारांच्या उपचारासाठी निधी खर्चच झालेला नाही. अशा आजारांना या योजनांमधून वगळून नवीन आजारांचा समावेश करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.
जनआरोग्य योजनेत डिप्रेशन, डिसअसोसिएटिव्ह डिसऑर्डर, एंग्झायटी डिसऑर्डर आणि डिमेंशिया या मनोविकार आजारांचा समावेश करावा, याबाबत निरंजन डावखरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. मनोविकार रुग्णांना आरोग्य विमा आणि ग्रुप विमा देणाऱ्या कंपन्या ह्या इन्शुरन्स रेग्युलेटरी ॲण्ड डेव्हलपमेंट (IRDA) या संस्थेच्या अखत्यारित येतात. ही संस्था केंद्राच्या अखत्यारित येते. २३ सप्टेंबर २०१८ पासून आजपर्यंत एकूण २०९१ रुग्णांनी या उपचाराचा लाभ घेतलेला असून दाव्यांकरिता १ कोटी ३ लाख ९९ हजार ९८७ रुपये विमा कंपन्यांद्वारे संबंधित रुग्णालयांना अदा करण्यात आले आहेत, असे मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.