(मुंबई)
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत ४,०८२ सदनिकांच्या विक्रीकरिता १४ ऑगस्ट, २०२३ रोजी लॉटरी काढण्यात येणार आहे. मुंबईतील अंधेरी, जुहु, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे उभारण्यात घरांसाठी सोमवारी (१४ ऑगस्ट) सकाळी ११.३० वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली.
म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीनंतर अतुल सावे यांनी ही माहिती दिली. मुंबई मंडळाच्या ४,०८२ सदनिकांच्या विक्रीकरिता १ लाख २० हजार १४४ अर्ज मिळाले आहेत. पात्र अर्जाची संगणकीय पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती सावे यांनी दिली. मुंबई मंडळाच्या सदनिका विक्रीची सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे.
या सोडत कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह, ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर उपस्थित होते.