(मुंबई)
म्हाडाच्या मुंबई मंडळाने २०२३ च्या सोडतीसाठी अत्यल्प आणि अल्प गटातील अनामत रक्कमेत कोणतीही वाढ करणार नसल्याचे जाहीर केले होते. आता मात्र, मंडळाने घुमजाव करीत अत्यल्प आणि अल्पसह सर्वच उत्पन्न गटाच्या अनामत रकमेत भरमसाठ वाढ प्रस्तावित केली. त्यानुसार अत्यल्प गटासाठी २५ हजार रुपये, अल्प गटासाठी ५० हजार रुपये, मध्यम गटासाठी एक लाख रुपये आणि उच्च गटासाठी दीड लाख रुपये अशी अनामत रक्कम प्रस्तावित केली आहे. यासंबंधिचा प्रस्ताव लवकरच म्हाडा उपाध्यक्षांसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येईल.
म्हाडाच्या सोडत प्रक्रियेत बदल करण्यात आला असून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सोडतीनंतरची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. तर नव्या प्रक्रियेसह सोडत काढताना पुणे आणि कोकण मंडळाने अनामत रक्कमेत वाढ केली. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि अनावश्यक अर्ज फिल्टर करण्यासाठी अनामत रक्कम वाढवण्याचा प्राधिकरणाचा विचार आहे. हे प्रकल्प खुल्या बाजारातील प्रकल्पांपेक्षा अधिक परवडणारे असल्याने अर्जदार अनेकदा त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने अनेक वेळा अर्ज करतात. त्यामुळे खऱ्या खरेदीदारांना संधी कमी मिळते. तसेच, जेव्हा म्हाडाच्या फ्लॅटचे विजेते त्यांचे फ्लट जास्त नफ्यात विकतात, याला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले.