दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांनी हेल्मेट वापरणं गरजेचं असल्याचा प्रचार नेहमीच सरकारी यंत्रणांकडून केला जातो. हेल्मेट न वापरणाऱ्यांना अनेक ठिकाणी दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. मात्र तरीही अनेकजण हेल्मेटशिवाय प्रवास करताना दिसतात. भारतात होणाऱ्या एकूण दुचाकीच्या अपघातांपैकी हेल्मेट न वापरल्यामुळे होणाऱ्या अपघातांचं प्रमाण अधिक आहे. हेल्मेट वापरल्यामुळे जीवघेण्या अपघातातून वाचल्याचीही अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात, मात्र तरीही अनेकजण हेल्मेट वापरत नसल्याचं दिसतं.
कर्नाटकमधील वाहतूक पोलिसांनी सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हेल्मेट वापरणं का गरजेचं आहे, हे समजून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ पाहा, असं पोलिसांनी म्हटलं आहे. एका अपघाताचा हा व्हिडिओ असून हेल्मेट असल्यामुळे दुचाकीस्वाराचे प्राण कसे वाचले, हे या व्हिडिओतून दिसत आहे.
असा झाला अपघात
या व्हिडिओत एक बस वळण घेताना दिसते. काही क्षणात एक तरुण बाईकवरून भरधाव वेगाने येत असल्याचं दिसतं. मात्र अचानक त्याचा अपघात होतो आणि बाईकवरून तो थेट बसच्या चाकाखाली फेकला जातो. बसचं चाक त्याला काही अंतर फरफटत नेतं. त्याचं डोकं बसच्या चाकाखाली असतं आणि त्या अवस्थेतच तो काही अंतर ढकलला जातो. या बाईकस्वाराने डोक्यावर हेल्मेट घातलेलं असतं. त्यामुळे एवढ्या भीषण अपघातानंतरही तो जिवंत राहतो आणि थोड्याच वेळात बरा होतो, असं दिसतं
ब्रँडेड हेल्मेट कसं ओळखायचं?
आयएसआय मार्क ही ब्रँडेड हेल्मेटची एकमेव खूण असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. आपल्या जिवाची काळजी असेल तर प्रत्येकवेळी बाईक चालवताना हेल्मेटचा वापर करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. व्हिडिओत दाखवलेल्या तरुणाने जर डोक्यावर हेल्मेट परिधान केले नसते, तर आज त्याची काय अवस्था झाली असती, याचा विचार करा, असं पोलिसांनी म्हटलं आहे. डोक्याच्या सुरक्षेसाठी आयएसआय मार्क असणारं हेल्मेटच घेण्याचा सल्लाही वाहतूक पोलिसांनी दिला आहे