( देवरुख )
संगमेश्वर तालुक्यातील पांंगरी येथील गावपर्यात 25 जानेवारी रोजी बालिका सापडली होती. सोशल मिडियातून या घटनेचा तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी बालिकेच्या आईला व तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. या पोलीस कोठडी तपासादरम्यान त्यांच्याकडून अनेक धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. बालिका हीच त्यांच्या प्रेमात अडसर ठरत होती. त्यामुळे तीला संपवण्याचा कट दोघांनी रचला.
बालिकेची आई सांची कांबळे (26) हीचा 5-6 वर्षापूर्वी विवाह झाला होता. तिला पतीपासून पहिला 4-5 वर्षांचा मुलगा आहे. पती तिच्यावर संशय घेत होता. पतीला दारुचे व्यसन असल्यामुळे तीही त्याला कंटाळली होती. याचदरम्यान तिचे मिथिलेश डांगे याच्याशी ओळखीतून प्रेम जुळले. एक-दीड वर्षापूर्वी तिच्या पोटी ही बालिका जन्माला आली. मात्र नवर्याला तिचा संशय येत होता. त्याने या मुलीचा स्वीकार केला नाही. माझी ही मुलगी नव्हेच म्हणत तो आपल्या मुलाला घेऊन निघून गेला. पतीने सोडल्यानंतर ती आईकडे कुवारबाव येथे येऊन राहू लागली. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे मुलीसह कुटुंब चालवणं कठीण जात होतं. त्यानंतर मिथिलेशचा आधार झाला. नवर्याने सोडल्यामुळे मिथिलेशला चांगलीच संधी मिळाली. त्याचं तिच्या घरी येणं, बाहेर फिरायला जाण चालू झालं. त्यानंतर त्यांचे संंबंध अधिकच वाढत गेले. प्रेमाच्या आणाभाका करता करता त्यांच्यात लग्नाच्या गोष्टी होत होत्या. मात्र ही मुलगी त्यांच्यात अडसर ठरत होती. त्यामुळे बाहेर फिरायला जाताना मुलीला टाकून बाहेर पडणं अवघड जात होतं. मुलीमुळे तो तिला स्वीकारायला तयार नव्हता. शेवटी त्यांचा मुलीला संपवायचा प्लॅन ठरला.
ठरलेल्या प्लॅननुसार 23 जानेवारी रोजी सकाळी 11.30 ते 12 वाजण्याच्या दरम्याने त्यांनी पर्यामध्ये 4 दगडांच्या मध्ये ठेवून तेथून पोबारा केला. मात्र बालिकेच्या नशिबाने साथ दिली आणि 25 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास अत्यवस्थ स्थितीत येथील सरपंच सुनील म्हादे, ग्रामसेवक अखिलेश गमरे, पोलीस पाटील श्वेता कांबळे व ग्रामस्थांना दिसून आली. त्यानंतर तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. या ठिकाणी देवरुख पोलीस ठाण्यातून दररोज लेडी कॉन्स्टेबलही तैनात करण्यात आली आहे.
या मुलीला ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हापासून पांगरी गावचे ग्रामसेवक अखिलेश गमरे अथक परिश्रम घेत आहेत. मुलीला डायपर आणून देणे, बिस्कीट देणे, खेळणी देणे तिच्याशी खेळणे अशाप्रकारे तिची काळजी घेत आहेत. एवढच नव्हे तर त्यांनी आपल्या पत्नीलाही मुलीच्या देखभालीसाठी सिव्हीलमध्ये ठेवून घेतले आहे. ही दोघं आपल्या मुलीप्रमाणे त्या बालिकेची काळजी घेत आहेत. आता तिलाही या दोघांचा लळा लागला आहे.
दरम्यान पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी साळोखे, देवरुख पोलीस निरीक्षक जाधव, संगमेश्वर पोलीस निरीक्षक झावरे, पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार मावळंकर, पोलीस हवालदार भुजबळराव, पोना. सडकर, तडवी, जोयशी, जाधव, कांबळे, मांढरे यांच्या पथकाने दोघांनाही जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून अजून अनेक बाबींचा उलगडा होणे बाकी आहे. त्यादृष्टीने चौकशी सुरु आहे. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी आणि अस कृत्य पुन्हा होऊ नये यासाठी पोलीस पुरावे गोळा करत आहेत. यापूर्वी त्या दोघांवर भादवि कलम 317 लावण्यात आलेलं होत. मात्र सध्या त्यांच्यावर 306, आयपीसी 36, बाल न्याय कलम 1915 चे कलम 75 नुसार अधिकची कलम लावण्यात आली आहेत.