(गुहागर)
सेंद्रीय शेतीकडे वळणे ही खरी काळाची गरज आहे. गुहागर तालुक्यातील मौजे उमराठच्या शेतकर्यांसाठी सेंद्रीय शेती विषयक मार्गदर्शन प्रशिक्षण मिळावे, यासाठी ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर हे आग्रही आणि प्रयत्नशील होते. त्यानुसार बुधवार दि. २६.४.२०२३ रोजी दापोली कृषी विद्यापीठ येथील सेंद्रिय शेती प्रकल्प, प्रशिक्षण हाॅल येथे हे परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती विषयक मार्गदर्शन प्रशिक्षण तालुका कृषी अधिकारी, गुहागर आणि सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र विस्तार शिक्षण संचालनालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने सदर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात उमराठच्या सुमारे ६० पुरूष आणि महिला शेतकऱ्यांनी अतिशय उत्साहात भाग घेतला होता.
सदर प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी कृषी विद्या विभागाचे प्रकल्प प्रमुख डॉ. प्रशांत शंकर बोडके साहेब, कृषी विद्या विभागाचे सहप्रकल्प प्रमुख व सहाय्यक प्राध्यापक डॉ वैभव अमरसिंह राजेमहाडीक, विस्तार शिक्षण विभागाचे व्यवस्थापक, कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र व सहयोगी प्राध्यापक डॉ. संतोष वरावडेकर, सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे कनिष्ट संशोधन छाञ, डॉ. विकास भारंबे, डाॅ. सानिका जोशी, श्री अमित पोळ तसेच गुहागर कृषी विभागाचे कृषी अधिकारी श्री सागर आंबावकर आणि कृषी सेवक श्री. सतीश सपकाळ उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. वैभव राजेमहाडीक यांनी आपण सेंद्रीय शेतीकडे वळण्याची कारण मिमांसा करताना सांगितले की, मोठ्या प्रमाणात होत असलेला रासायनिक खतांचा आणि कीटकनाशके इत्यादींचा वापर यामुळे मानवी आरोग्याला धोका तसेच जमिनीचे आरोग्य सुद्धा धोकादायक होत गेल्याने आपण सेंद्रीय शेतीकडे वळतो आहोत, असे सांगितले
पहिल्या सत्रात मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, कुठल्याही प्रकारचे रसायन/केमिकल न वापरतात आधुनिक पद्धतीने सेंद्रीय शेती करणे आणि स्वतःचे आरोग्य व जमिनीचे आरोग्य सांभाळणे. शेतीमध्ये खताचे योग्य प्रमाणात नियोजन, शेतीवरील किड-भुंगा नियोजन व तन नियंत्रण करणे फारच गरजेचे असते. नैसर्गिक साधनाचा वापर करून औषध, खते तयार करणे व पारंपरिक बियाणांचा वापर करून केलेली विषमुक्त म्हणजेच रसायनाचा वापर टाळून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती असे प्रशिक्षक अमित पोळ यांनी सांगितले. गांडूळखत, हिरवळीचे खत, पिक फेरपालट, सेंद्रीय खते, जैविक खते, मिश्र पिक पध्दती यांचा वापर केला पाहिजे.
हरितक्रांतीमुळे रासायनिक खतांचा व औषधांचा अनियंत्रित वापर, जमिनीची सुपिकता व उत्पादकते मध्ये घट, रोग व किडींचा वाढता प्रादुर्भाव, जमिनीतील उपायुक्त जिवाणूंचा -हास, उत्पादन खर्चात वाढ, जमीन, हवा आणि पाणी प्रदूषण आणि मानवी आरोग्यावर दुष्परिणाम यामुळे सेंद्रीय शेतीची गरज आहे. सेंद्रीय शेतीमध्ये किटकांचे व्यवस्थापन करताना चिकट सापळा, कामगंध साफळा, फनेल सापळा ईत्यादी सापळे वापरण्यात यावेत तसेच सुधारीत नवीन बी-बियांने आणि वाफा पद्धतीने शेती लागवड केली पाहिजे असे मार्गदर्शन प्रशिक्षक सानिका जोशी यांनी केले.
दुपारच्या सत्रात गांडूळखत, कम्पोस्ट खत तसेच सेंद्रिय खत व फवारणी औषधे कशी तयार करावयाची यांचे प्रत्येक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले. सदर प्रशिक्षणाची सांगता करताना सरपंच जनार्दन आंबेकर यांनी दापोली कृषी विद्यापीठाच्या सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्यावतीने दिलेल्या उत्तम प्रशिक्षणा बद्दल सर्व अधिकारी वर्ग व प्रशिक्षक यांचे आभार मानले. तसेच गुहागर एस.टी.डेपो मॅनेजर व संबंधित अधिकारी आणि तालुका कृषी विभाग, गुहागरचे कृषी सेवक सतिश सपकाळ यांनी एस.टी. बस कमी अवधीत उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.
सदरचे मार्गदर्शन प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत उमराठचे ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे, कर्मचारी नितीन गावणंग, डाटा आॅपरेटर साईस दवंडे आणि ग्राम रोजगार सेवक प्रशांत कदम यांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले.