(नवी दिल्ली)
कॉंग्रेस पक्षाने कार्यकर्ते, नेते आणि जनतेकडून देणगी मिळवण्याची मोहीम सुरू केली आहे. संबंधित मोहिमेचा प्रारंभ झाल्यानंतर ४८ तासांत पक्षाला २.८१ कोटी रूपयांची देणगी उपलब्ध झाली.
कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी पक्षाच्या डोनेट फॉर देश या ऑनलाईन मोहिमेचा प्रारंभ केला. किमान १३८ रूपये आणि त्या पटीत कमाल १.३८ लाख रूपयांपर्यंत देणगी देता येऊ शकणार आहे. स्वत: खर्गे यांनी १.३८ लाख रूपये देणगी दिली. तेवढी रक्कम पक्षाच्या ३२ नेत्यांनी जमा केली. त्यामध्ये राहुल गांधी, सुशीलकुमार शिंदे, अशोक गेहलोत, जयराम रमेश, प्रणिती शिंदे आदींचा समावेश आहे. मोहीम सुरू झाल्यानंतर ४८ तासांत १ लाख १३ हजार जणांनी कॉंग्रेसला देणगी दिली.
राज्यांचा विचार करता महाराष्ट्रातून कॉंग्रेसला सर्वांधिक ५६ लाख रूपयांची देणगी मिळाली. त्याखालोखाल राजस्थानातून २६ लाख रूपये जमा झाले. दिल्लीतून २० लाख, उत्तरप्रदेशातून १९ लाख, तर कर्नाटकातून १८ लाख रूपयांची देणगी मिळाली. बिहारमधूनही अनेकांनी देणगी दिली. मात्र, रक्कम स्वरूपात ती देणगी इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे.
२० हजार सायबर हल्ले
देणगीशी संबंधित कॉंग्रेसच्या ॲपवर तब्बल २० हजार सायबर हल्ले झाले. त्यातील बहुतांश परदेशांतून झाल्याचे सांगितले जाते. तर डेटा चोरीच्या उद्देशातून १ हजार ३४० सायबर हल्ले झाले.