(नवी दिल्ली)
ऑल्ट न्यूजचे सहसंस्थापक आणि फॅक्ट चेकर मोहम्मद जुबैर यांच्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने जुबैर यांना पाच दिवसांचा जामीन मंजूर केला, पण जामीन मिळूनही जुबैर यांची जेलमधून सुटका होणार नाही. सध्या ते दिल्ली पोलिसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांना नोटीस बजावली होती. त्यात जुबैर यांना अटी आणि शर्थीवर जामीन मंजूर करण्यात येत असल्याचे म्हटले होते. न्यायालयीन सूचनांनुसार जुबैर यांना न्यायालयीन क्षेत्राबाहेर जाता येणार नाही. तसेच या प्रकरणावर अंतरिम सुनावणी होईपर्यंत त्यांना कसलेही ट्विट करता येणार नाही, असे म्हटले होते.
मोहम्मद जुबैर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. यावेळी न्यायालयात केलेल्या याचिकेत जुबैर यांनी धार्मिक भावनांचा अनादर केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. जुबैर यांनी अलाहाबाद न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने १३ जूनला फेटाळून लावली. त्यानंतर जुबैर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.