(नवी दिल्ली)
र्नैऋत्य मोसमी वारे देशाच्या विविध भागांत प्रवेश करण्यापूर्वी होणारा पूर्वमोसमी पाऊस, हंगामातील मोसमी पाऊस आणि त्यानंतर होणारा अवकाळी पाऊस, असे कमी-अधिक प्रमाणातील पावसाचे चक्र वर्षभर सुरू असते. गेल्या काही वर्षांत हे चक्र अधिकच स्पष्टपणे महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या विविध भागात दिसले आहे. परंतु, हमखास पडणाऱ्या मोसमी पावसाचा कालावधी महत्त्वाचा समजला जातो. ढोबळपणे जून ते सप्टेंबर हा मोसमी पावसाचा चार महिन्यांचा कालावधी असतो.
यावर्षी पावसाच्या आगमनाबाबत भारतीय हवामान खात्याने आणि स्कायमेट वेदर या खासगी संस्थेने वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. भारतीय हवामान खात्याने यंदाचा पाऊस 22 मे रोजी अंदमानात दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर दुसरीकडे यंदा मान्सून अंदमानमध्ये उशिराने दाखल होणार, असे स्कायमेटने म्हटले आहे. या भिन्न हवामान अंदाजांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. यावर्षी मान्सून उशिराने दाखल होण्याचा अंदाज असल्याचे स्कायमेट वेदरने म्हटले आहे.
पाऊस अंदमानमध्ये साधारणपणे दरवर्षी 22 मे रोजी दाखल होतो. मात्र, यंदा त्याची वाटचाल कमकुवत दिसत आहे. त्यामुळे यंदा मान्सून अंदमानमध्ये विलंबाने दाखल होण्याचा अंदाज स्कायमेटच्या शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये साधारणपणे 1 जून रोजी दाखल होतो, मात्र, नैऋत्य मान्सूनसंदर्भात आताच भाकीत करणे अवघड असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले.