( मुंबई )
मोबाइलमध्ये गेम खेळण्याच्या नावाने एका ज्येष्ठ नागरिकाला 22 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. बेस्टच्या सेवेमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या आयुष्यभराच्या कमाईवर डल्ला मारणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
काही महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये वास्तव्याला असणारे प्रकाश नाईक ( 68 वर्ष) हे बेस्टमधून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर त्यांना बेस्ट प्रशासनाकडून त्यांच्या बँक खात्यात त्यांनी केलेल्या सेवेचा मोबदला, देणी म्हणून जवळपास 22 लाख रुपये देण्यात आले. निवृत्तीनंतर प्रकाश नाईक गोरेगावमधील दिंडोशी बस आगाराजवळ दररोज फिरण्यासाठी जात असे. दरम्यान त्या ठिकाणी त्यांची ओळख अनोळखी मुलांसोबत झाली. ओळख झाल्यानंतर त्या दोन्ही मुलांनी प्रकाश नाईक यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर गेम खेळण्यासाठी हे दोघेही त्यांचा मोबाइल वापरत होते. या दोघांनी मोबाइलमध्ये गुगल पे हे मोबाइल ॲप डाउनलोड करून त्यांच्या खात्यातून दोन महिन्यात 22 लाख रुपयांना गंडा घातला. ही चोरी इतकी बेमालूमपणे झाली की प्रकाश नाईक यांना याची काहीच माहितीदेखील झाली नाही.
प्रकाश नाईक एक दिवस बँकेमध्ये आपल्या बँक खात्याबद्दल माहिती घ्यायला गेले असता त्यावेळी बँकेने माहिती दिल्यावर त्यांना मोठा धक्का बसला. या प्रकाराबाबत त्यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात जाऊन फसवणूक झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. दिंडोशी पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली. शुभम तिवारी (22 वर्ष) आणि अमर गुप्ता (28 वर्ष) असे आरोपींचे नाव असून त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. हे दोन्ही आरोपी प्रकाश नाईक यांच्याकडून मोबाइलमध्ये गेम खेळण्याचा नावाने मोबाइल घेऊन “गुगल पे”च्या माध्यमातून आपल्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करून व्यवहार झाला असल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलमधून डिलीट करत असायचे. मोबाइलमधील सर्व पुराव्यांची स्वच्छता केल्यानंतर त्यांना पुन्हा मोबाइल द्यायचे. आरोपींनी अशा प्रकारची फसवणूक इतरांसोबत केली आहे का, याबाबतही पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे परिमंडळ 12 चे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. या प्रकरणाबाबत आरोपींची कसून चौकशी सुरू असून अधिक तपास दिंडोशी पोलीस करत आहे.