( साईशा / राजापूर)
मुलांना मोबाईल मधून बाहेर काढण्यासाठी मदत करा … अशी आर्त साद राजापूर तालुक्यातील साने गुरुजी विद्यामंदिर जानशीच्या पालक शिक्षक सभेमध्ये अनेक पालकांनी घातली आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद होत्या आणि मुलांच्या अभ्यासासाठी त्यांच्या हातात मोबाईल आला होता. मोबाईलच्या वापरामुळे मुलांचे किती शिक्षण झालं हा संशोधनाचा विषय आहे.
मात्र एक मुलांना मोबाईलचे व्यसन जडल्यासारखे झाले आहे. ग्रामीण भागात तर अत्यंत गरिबीची परिस्थिती असताना देखील अनेक लोकांनी उधार उसनवारी करून आपल्या मुलांना मोबाईल घेऊन दिले आहेत. शाळेतून सेतू अभ्यासक्रमा सारखे अभ्यासक्रम मोबाईल वर पाठविले जातात ते निमित्त करत मुलं सातत्याने मोबाइलमध्ये गुंतलेली असतात .
आता नेहमीप्रमाणे शाळा सुरू झालेल्या आहेत तरीसुद्धा मुले अजून मोबाईल मधून बाहेर येण्याची चिन्हे दिसत नाहीत .
या मुलांना मोबाईल मधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
मोबाईलवरून सेतू सारखे अभ्यासक्रम आजही पाठविले जातात अनेक शिक्षक तर मुलांना काही शंका आल्यास युट्युब वर जाऊन सर्च करा असेही सल्ले देतात त्यामुळे मुलांनाही मोबाईल हा आपल्या शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे असेच वाटायला लागले आहे.
मात्र दहा ते पंधरा मिनिटे मोबाईलवर अभ्यास केल्यानंतर दिवसभर गेम आणि अन्य सोशल माध्यमांमध्ये मुले गुरफटलेली असतात. त्यामुळे या मुलांना मोबाईल मधून बाहेर पडण्यासाठी मदत करावी असे विनंतीवजा आवाहन अनेक पालकांनी शिक्षकांनाच केले आहे.
पालकांपेक्षा शिक्षकांचे जास्त मुले ऐकतात असा विश्वास अनेक पालकांना असल्यामुळे मोबाईल वरून सुरू असलेले शिक्षण किंवा अभ्यासक्रम देणे शाळेने आणि शासनानेही बंद करावे असा ठरावच या सभेमध्ये करण्यात आला.
जेव्हा नाईलाज होता तेव्हा मुलांकडे मोबाइल असणे अनिवार्य झाले होते मात्र आता शाळा नियमित सुरू झाल्या आहेत त्यामुळे शालेय शिक्षणाबरोबरच त्यांना खेळांमध्ये ही आवड निर्माण व्हावी असे प्रयत्न जाणीवपूर्वक करण्याची आवश्यकता आहे अशी सुद्धा मते व्यक्त करण्यात आली.