(नवी दिल्ली)
देशातील ईपीएफओशी संबंधित विविध लोकांच्या खात्यांचा डेटा सायबर गुन्हेगारांनी चोरी केला आहे. त्याचा वापर करत ईपीएफ खात्यांमधून कोट्यवधी रुपये काढले गेले आहेत. ईपीएफओने सीबीआयकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली होती. ईपीएफओनेच्या विनंतीवरून सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. सीबीआयने या प्रकरणातील संशयित ठिकाणांवर छापे टाकले आहेत. या प्रकणाशी संबंधित आरोपी प्रियांशूकुमारला सीबीआयने अटक केली आहे.
सीबीआयला या तपासात एकच यूएएन वेगवेगळ्या नावाच्या ईपीएफ खात्यांना अटॅच असल्याचे आढळले. तसेच त्या खात्यांतून वारंवार ऑनलाइन पैसेही काढले गेले आहेत. चंदीगडमध्ये वेगवेगळ्या ईपीएफ खात्यांतून १ कोटीहून अधिक रुपये काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे व असाच प्रकार पंजाबच्या भटिंडा, अमृतसर व जालंधरमध्येही आढळून आला आहे. सीबीआय तपासात देशातील ८ राज्यांमध्ये असाच पॅटर्न असल्याचे उलगडले आहे. आरोपींनी विविध बँकांत त्याच नावाने खाते उघडून आधारशी ल्ािंक केले आणि ईपीएफ खात्यांमध्येही बनावट आधार ल्ािंक केले. त्यानंतर ऑनलाइन अर्ज करून ईपीएफ खात्यांतून कोट्यवधी रुपये काढले.
चंदीगडच्या सुखदेवसिंह यांनी कंपनीतून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर आपल्या ईपीएफ खात्यातून रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या खात्यात पैसेच नसल्याचे त्यांना कळले. त्यांच्या खात्यातून पाच वेळा पैसे काढण्यात आले होते. मात्र, त्यांनी एकही पैसा काढलेला नव्हता. यानंतर त्यांनी कंपनीच्या माध्यमातून ईपीएफओमध्ये तक्रार केली. चौकशी झाल्यानंतर कळले की, पैसे सुखदेवसिंह यांच्या माध्यमातूनच काढण्यात आले व ते सुखदेवसिंह यांच्याच खात्यात गेले आहेत. आश्चर्य म्हणजे यात सुखदेवचे नाव-माहिती बरोबर होती, पण बँक खाते, यूएएन व आधार त्यांचा नव्हता. यानंतर ईपीएफओने ऑडिट केले असता अशा अनेक लोकांना शिकार बनवण्यात आल्याचे समोर आले.
दिल्ली, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार व झारखंडमध्ये ईपीएफ खात्यांची संवेदनशील माहिती लीक झाल्याचे समोर आले आहे. याचा गौप्यस्फोट ईपीएफओच्या वार्षिक ऑडिट रिपोर्टमधून झाला. आरोपींनी ईपीएफचा डेटा हॅक केला. त्यानंतर ज्यांनी आपले आधार कार्ड व मोबाइल नंबर ईपीएफ खात्याशी लिंक केले नव्हते अशा लोकांची माहिती गोळा केली. त्यानंतर या लोकांचे नाव, जन्म तारीख आदींसह बनावट कागदपत्रांच्या आधारे आपले आधार नंबर अपडेट केले.
अनेक जणांनी कंपनीतून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर आपल्या ईपीएफ खात्यातून रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या खात्यात पैसेच नसल्याचे त्यांना कळले. त्यांच्या खात्यातून अनेक वेळा पैसे काढण्यात आले होते.