(मुंबई)
गोव्याचे भूषण ठरणारे व गोव्याच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या मोप येथील मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवार, ५ जानेवारीपासून प्रत्यक्षात सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विमानतळाचे अलीकडेच उद्घाटन केले होते. ३ हजार कोटी रुपये खर्च करून हा विमानतळ मोप येथे बांधलेला आहे. या विमानतळाचे नाव मनोहर पर्रीकर यांच्या नावे झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पद्मभूषण कै. मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोप ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यास मान्यता देण्यात आली होती. माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले पर्रीकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोप असे नाव देण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. मात्र, लोकांची मागणी ही मनोहर पर्रीकर असे पूर्ण नाव देण्याची आहे, ती मात्र अपूर्णच राहिली आहे.
उत्तर गोव्यातील बहुप्रतिक्षित मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी हैद्राबाद-गोवा ही पहिली व्यावसायिक फ्लाईट विमानतळावर उतरली. हैद्राबादवरून 7.40 वाजता निघालेले इंडिगो कंपनीचे 6E6145 हे विमान मोपा येथील मनोहर विमानतळावर 8.40 वाजता पोहोचले. या विमानाने हैद्राबाद ते गोवा अंतर 1 तासांत पूर्ण केले. विमानातील प्रवाशांचे वाजत गाजत मोपा विमानतळावर स्वागत करण्यात आले.
उत्तर गोव्यातील मोपा येथे असलेले हे विमानतळ सुरू झाल्याने केवळ गोवाच नव्हे तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यांनाही यामुळे चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या विमानतळावरून विमान कंपनी इंडिगोने देशातील 8 शहरांसाठी उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये देशाची राजधानी दिल्लीचाही समावेश आहे. त्याबरोबरच गो फर्स्ट आणि अकसा एअर ह्या कंपन्यांनी ह्या विमानतळावरून सेवा चालू करण्याचे जाहीर केले आहे. .
इंडिगोने मोपा विमानतळावरून 168 साप्ताहिक उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही उड्डाणे हैदराबाद, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, पुणे, जयपूर आणि अहमदाबादसाठी असणार आहेत. गुरूवारपासून ही उड्डाणे सुरू झाली.
मुंबई ते गोवा अकसा एअर विमानाचे इकॉनॉमी क्लासचे प्रवासभाडे २३९३ रुपयांपासून सुरू होत आहे. विमान कंपन्या, प्रवासाची तारखेनुसार हे भाडे कमी जास्त आहे. हे विमानतळ सिंधुदुर्ग जिल्हयाच्या जवळ असल्याने जलद आणि आणीबाणीच्या Emergency वेळेस तळकोकणात जाण्यासाठी एक सोयीचा पर्याय ह्या विमानतळाच्या रूपाने निर्माण झाला आहे.
सध्या मुंबई ते गोवा आणि परतीसाठी इंडिगो आणि गो फर्स्ट कंपनीचे प्रत्येकी एक उड्डाण ह्या विमानतळावरून होत आहे. पुढच्या आठवड्यात अकसा एअर कंपनीपण ह्या मार्गावर येथून आपली सेवा चालू करणार आहे.