(मुंबई)
राहुल गांधी यांच्यावर भाजप सरकार आकसापोटी कारवाई करत असल्याच्या विरोधात काँग्रेसने गुरुवारी मुंबईत जोरदार आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली. जनतेचे पैसे घेऊन पळालेल्यांवर राहुल गांधी यांनी भूमिका घेतली तर त्यांच्यावर खोटे आरोप लावून दबावाखाली कारवाई करण्यात आली. दबावाखाली होत असलेल्या कारवाईचा काँग्रेसने निषेध केला आहे. ललित मोदी आणि नीरव मोदी यांच्याबद्दल बोलल्यानंतर जर शिक्षा होत असेल तर काँग्रेस पक्ष राज्यभर जेल भरो आंदोलन करुन त्याचा निषेध करेल, असा इशाराही त्यांनी दिला. सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसने आधीच भूमिका स्पष्ट केली आहे, परंतु विरोधी पक्ष जाणीवपूर्वक राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप पटोले यांनी केला.
तर काँग्रेस पक्षाचा देशभर वाढता प्रभाव पाहता केंद्रातील सत्ताधारी पक्ष घाबरलेला आहे. या परिस्थितीतूनच विरोधकांवर कारवाई केली आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या दबावतंत्राविरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही म्हणून काँग्रेसने हे आंदोलन केले आहे, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राहुल गांधी यांच्यावर आकसाने आणि तेही गुजरातमधून कारवाई केली आहे. सुरत न्यायालयाच्या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष वरच्या न्यायालयात धाव घेईलच, परंतु राहुल गांधी आक्रमक भूमिका घेत जनतेचे प्रश्न मांडत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता पराभवाची भीती वाटू लागली आहे. राज्यातील विधान परिषद आणि विधानसभा पोटनिवडणुकीतही त्याचा प्रत्यय आलेला आहेच. म्हणूनच पराभव दिसू लागल्याने निवडणुकीच्या तोंडावर अशा कारवाया सुरु आहेत. भाजपच्या अशा कारवायांविरोधात काँग्रेसही चोख उत्तर देईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या आंदोलनात माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणजितसिंग सप्रा, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.