(नवी दिल्ली)
मोदी सरकारने २०१४ पासून विविध जाहिरातींसाठी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर ३,२६०.७९ कोटी तर मुद्रित माध्यमांमध्ये जाहिरातींवर ३,२३०.९९ कोटी रुपये खर्च केले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार मुनियान सेल्वाराज यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अनुराग ठाकूर यांनी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावरील जाहिरातींवरील खर्चाचा लेखाजोखा सादर केला.
मंत्र्यांनी यावेळी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, सन २०१४-१५ ते ७ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रिंट मीडियाद्वारे जाहिरातींवर ३१३८.८१ कोटी रुपये खर्च करण्यात आले, तर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे ३२६०.७९ कोटी रुपये या कालावधीत जाहिरातींवर खर्च करण्यात आले.
सन २०१४-१५ पासून दरवर्षातील खर्चाची आकडेवारी देताना २०२२-२३ मध्ये ७ डिसेंबर २०२२ पर्यंत प्रिंट मीडियावर ९१.९६ कोटी रुपये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर ७६.८४ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या माध्यमातून परदेशी माध्यमांमधील जाहिरातींवर कोणताही खर्च करण्यात आला नाही.