(मुंबई)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त ८ वर्षांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एका मंचावरआले. या कार्यक्रमाची खूप आधीपासून चर्चा सुरू होती. या कार्यक्रमामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर होता. अखेर शऱद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
शरद पवार मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे पवारांच्या राजकीय भूमिकांविषयी शंका उपस्थित केली जात आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्यांसह अनेक राजकीय विश्लेषकांनी शरद पवारांमुळे लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होत असल्याचं म्हटलं आहे. पवारांच्या मोदीसोबत व्यासपीठ शेअर करण्यावरून राष्ट्रवादीचा अनेक वर्षांपासूनचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसकडूनही मोठी प्रतिक्रिया आली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी शरद पवारांना सल्ला देत म्हटलं आहे की, शरद पवारांनी त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट करून लोकांमधील संभ्रम दूर करावा. अशोक चव्हाण म्हणाले, शरद पवारांच्या या कार्यक्रमातील उपस्थितीमुळे लोकांमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. त्यामुळे पवारांसारख्या अनुभवी नेत्यांनी लोकांमधला संभ्रम दूर करावा. शरद पवारांनी त्यांची भूमिका, जी त्यांनी आधीच घेतली आहे, ती स्पष्ट करून लोकांमधील संभ्रम दूर केला तर अधिक चांगलं होईल.
एका खासगी संस्थेने घेतलेला हा कार्यक्रम होता. अशा कार्यक्रमात सहभागी होणं काही चुकीचं वाटत नाही. परंतु देशात एकीकडे भाजपाप्रणित एनडीएविरुद्ध सर्व विरोधकांची एकजूट होत असताना तसेच इंडियाच्या बॅनरखाली सर्व विरोधी पक्षांची मोट बांधली जात आहे. अशा परिस्थितीत शरद पवारांच्या अशा कार्यक्रमातील उपस्थितीमुळे जनतेमध्ये अनेक बाबतीवरून संभ्रमाचं वातवरण निर्माण होत आहे, असे ते म्हणाले.
शरद पवारांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न विचारण्यात आल्यानंतर अजित पवार माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, पुरस्काराचा हा कार्यक्रम फार पूर्वीच ठरला होता. सर्वांना माहिती आहे की, टिळक परिवाराची ही संस्था आहे. या संस्थेद्वारे आतापर्यंत अनेक दिग्गजांना हा पुरस्कार दिला आहे. यावेळी संस्थेतील लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाचा पुरस्कार दिला जाण्याचं ठरवलं. परंतु,पंतप्रधानांशी संपर्क कसा करायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यामुळे त्यांनी शरद पवारांशी संपर्क केला. टिळक स्मारक समितीच्या विनंतीनंतर शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून या कार्यक्रमाची त्यांना माहिती दिली. तसेच शरद पवारांनी पंतप्रधानांना संस्थेच्यावतीने कार्यक्रमाला येण्याची विनंती केली, असे ते म्हणाले.