(शिर्डी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थव्यवस्थेबाबत फसव्या घोषणा करत आहेत. गँरंटी-गॅरंटी म्हणजे मोदींची आहे तरी काय, ४०० जागांवर भाजपचा विजय होईल, असे सांगितले जाते. पण देशातील परिस्थिती वेगळी आहे. भाजपची लोकप्रियता फारशी राहिलेली नाही. विशेषत: महाराष्ट्रातील राज्यकर्ते मराठा समाजाला खोटी आश्वासन देत आहेत, त्यांची फसवणूक करत आहे, असा घणाघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला.
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये 400 जागा जिंकल्या जातील असा दावा भारतीय जनता पक्ष (BJP) करतो आहे. मात्र, या दाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी गणिती पद्धतीने उत्तर दिले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपविरोधी वातावरण आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये तर त्यांची नावालाही सत्ता नाही. ज्या राज्यांमध्ये आहे त्या राज्यांमध्ये विरोधकांचीही ताकद आहे, असे असताना कोणत्या आधारावर आपण 400 जागा येतील असे म्हणता? असा थेट सवालच शरद पवार यांनी विचारला आहे.
शिर्डी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन दिवसीय शिबिर पार पडले. या शिबिराच्या समारोपप्रसंगी शरद पवार यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मागच्या काही दिवसांपासून पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात अस्वस्थता होती. या सर्वांच्या मनात पक्षीय विचार पक्का करण्याच्या दृष्टिकोनातून हे शिबिर घेण्यात आले, असे ते म्हणाले. भाजप २०२४ मध्ये ४५० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळविण्याचा दावा करीत आहे. मात्र, देशात भाजपची लोकप्रियता राहिलेली नाही. अनेक राज्यांत भाजपची स्वबळावर सत्ता नाही. गोव्यात कॉंग्रेसचे सरकार होते, तिथे आमदार फोडून सत्ता स्थापन केली, असा आरोप त्यांनी केला.
बेरोजगारी, महागाईचा प्रश्न गंभीर आहे. गॅस दर ११०० रुपये झाला. अन्नधान्य महाग झाले. मात्र, सरकारने याबाबत कधीच दिलासा दिला नाही. आपण आता १४० कोटींच्या पुढे गेलो आहोत. लोकसंख्येचा दबाव वाढत आहे. शेतक-यांची अवस्था चिंताजनक झाली आहे. शेतक-यांचा बोजा कमी करण्यासाठी धोरणे आखण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्यावर काम होत नाही, असा आरोप पवार यांनी केला.
सरकारने शेतकरी प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. एका बाजूने शेती मालाला किंमत द्यायची नाही आणि दुसरीकडे शेतमाल निर्यातीवर बंधने आणायची, असे भाजप सरकारचे धोरण आहे. त्यामुळे शेतकरी आणि जनता अडचणीत आली आहे. शेतक-यांकडे दुर्लक्ष केल्यानेच शेतकरी आत्महत्येत लक्षणीय वाढ झाल्याचे शरद पवार म्हणाले.
जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष नाही
राज्यात जनतेचे अनेक प्रश्न आहेत. मात्र, त्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. आज राज्यात पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. तसेच अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडेही सरकार लक्ष देत नाही. आरक्षणाचा प्रश्नही प्रलंबित आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर आमच्या दारात येऊन आम्ही आरक्षण देऊ, असे म्हणत होते. परंतु प्रत्यक्षात आरक्षण दिले गेले नाही. आता मराठा, धनगर, लिंगायत आरक्षणाचा मुद्दा जो सोडवेल, त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू, असे सांगतानाच मी दिल्लीतील अदृश्य शक्तीविरोधात कायम लढत राहीन, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.