(नवी दिल्ली)
भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. आपल्या दीड तासांच्या भाषणात त्यांनी 2014 पासूनचा भारताचा विकास, राजकारणातील घराणेशाही, भ्रष्टाचार या मुद्यांवर भाष्य करीत नेहमीप्रमाणे काँग्रेसवर झोड उठवली. मात्र आदिवासींसाठी विशेष बाब म्हणजे त्यांनी तब्बल 13 ते 15 हजार कोटी रुपयांच्या मोठ्या विश्वकर्मा योजनेची घोषणा केली. या योजनेच्या घोषणेमुळे 2024 च्या निवडणुकीत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानसारख्या राज्यात याचा फायदा होण्याची शक्यता आहे. आणखी विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भाषणात मणिपूरचा उल्लेख केला आणि तिथे शांतता प्रस्थापित होईल असे अखेर आश्वासन दिले.
मोदी भाषणात म्हणाले की, पुढील महिन्यात विश्वकर्मा दिनाचे औचित्य साधत ओबीसी बांधवांसाठी विश्वकर्मा योजना लागू होणार आहे. या योजनेचा फायदा अनेकांना होईल. देशातील योजनांचा फायदा लाखो लोकांना झाला आहे. पारंपरिक कौशल्य असलेल्यांसाठी पुढील महिन्यात सरकार 13,000 ते 15,000 कोटी रुपयांच्या वाटपासह विश्वकर्मा योजना सुरू करेल. या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या वस्तू तयार करणार्यांना आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. प्रशिक्षण, अनुदान आणि तांत्रिक सहाय्य केले जाणार आहे. लोहार, सुतार, कुंभार अशा विश्वकर्मांसाठी ही योजना राहणार आहे.
मागील काही आठवड्यांमध्ये ईशान्य भारतात विशेष करून मणिपूरमध्ये आणि हिंदुस्तानच्या इतरही काही भागात हिंसाचार झाला. त्यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. आई-बहिणींच्या सन्मानाला धक्का लावण्यात आला. मात्र, काही दिवसांपासून सातत्याने तेथे शांतता प्रस्थापित झाली आहे. त्यांनी हे शांततेचं पर्व पुढे न्यावे. शांततेतूनच या प्रश्नावर मार्ग निघेल. राज्य आणि केंद्र सरकार त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भरपूर प्रयत्न करत आहे आणि करत राहील. देश मणिपूरमधील नागरिकांबरोबर आहे.
जग कोविडनंतर अजून बाहेर आलेला नाही. महागाईने जग होरपळत आहे, पण भारताने महागाई नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न केले. दूरदृष्टी हे आमच्या सरकारचे वैशिष्ट्य आहे. आम्ही काळाच्या पुढील विचार करून युवा, शेतकरी, महिला, मुलींसाठी योजना आणल्या आहेत. आपली सामरिक शक्ती वाढली आहे. म्हणून हा भारत ना थांबतो, ना थकतो, ना हरतो. 2047 मध्ये देखील आपल्याला देशाला याच वेगाने प्रगती करताना पाहायचे आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिला सबलीकरण. जी-20 मध्येही मी महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा मुद्दा मी मांडला. महिलांच्या वाढलेल्या नेतृत्त्वामुळे भारताच्या प्रगतीला आणखी पैलू पडला आहे.
भ्रष्टाचाराचा राक्षस देशाला खात होता. लाखो-कोट्यवधींचे घोटाळे होत होते. आम्ही ही गळती थांबवून मजबूत अर्थव्यवस्था तयार केली. मी दहा वर्षांचा हिशेब तिरंग्याच्या साक्षीने देत आहे. आज साडेतेरा कोटी लोक गरिबीच्या रेषेतून बाहेर आले आहेत. गरिबांची खरेदीशक्ती वाढते, तेव्हा मध्यमवर्गाची व्यापारशक्ती वाढते. या अर्थचक्राला बळ देऊन आपल्याला पुढे जायचे आहे. जे लोक शहरात राहतात, मात्र भाड्याच्या घरात राहतात, झोपडीत, चाळीत राहतात, अशा लोकांसाठी आम्ही योजना आणणार आहोत. अशा लोकांच्या गृहकर्जावर व्याजदरात कपात करून मोठा दिलासा देण्याची आमची योजना आहे. भ्रष्टाचाराने देशाची व्यवस्था पोखरली आहे. भ्रष्टाचाराविरोधात लढाई मी लढत राहणार. दुसरी मोठी समस्या परिवारवादाची आहे. घराणेशाहीने देशाच्या लोकांचा हक्क हिरावून घेतला आहे. तिसरी तुष्टीकरणाची समस्या आहे. या तीन वाईट गोष्टींविरोधात आपल्याला संपूर्ण सामर्थ्यानिशी लढायचे आहे.
घराणेशाही असलेले पक्ष ही एक राजकीय विकृती आहे. कुटुंबाची, कुटुंबाद्वारे आणि कुटुंबासाठी राजकीय पक्ष हा त्यांचा मंत्र आहे. परिवारवाद प्रतिभेचा शत्रू असतो, सामर्थ्याला घराणेशाही नाकारते. प्रत्येकाला हक्क मिळावा, सामाजिक न्यायासाठी, देशातील लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी घराणेशाहीची कीड मुळापासून उपटून टाकायला हवी. तुष्टीकरण हाही विकास, सामाजिक न्यायाचा शत्रू आहे.
आपण भारताच्या अमृतकाळात आहोत. या कालखंडात होणार्या घटनांचा प्रभाव पुढील 1000 वर्षांच्या इतिहासावर होणार आहे. गेल्या 8-10 वर्षांत जगभरात भारताच्या सामर्थ्याप्रति एक विश्वास, आकर्षण, आशा निर्माण झाली आहे. आज आपल्याकडे डेमोग्राफी (लोकसंख्या), डेमोक्रसी (लोकशाही) आणि डायव्हर्सिटी (विविधता) आहे. ही त्रिवेणी भारताच्या प्रत्येक स्वप्नाला साकार करण्याचे सामर्थ्य राखते. जगभरातल्या देशातले वयोमान घटत आहे, पण भारतात सर्वाधिक लोकसंख्या 30 वर्षांपेक्षा कमी आहे. आपल्या देशाकडे कोटी कोटी भुजा, कोटी कोटी संकल्प आहेत. त्यामुळे आपण इच्छित परिणाम साधू शकतो. आज जग तंत्रज्ञानाने भारलेले असताना आणि येणारे युगही तंत्रज्ञानाचे असताना, भारतात तंत्रज्ञान कौशल्याची एक नवी भूमिका राहणार आहे. भारतात केवळ प्रमुख शहरांमध्येच नव्हे तर छोट्या शहरांमधून, गावांमधूनही तरुणांच्या आशा-आकांक्षा, सामर्थ्य पुढे येत आहे.
देशातले कृषी क्षेत्र आघाडीवर आहे. देशातल्या श्रमिकांचेही देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. व्यावसायिकांची मोठी भूमिका आहे. आज भारत ग्लोबल साऊथचा आवाज बनत आहे. जागतिक पुरवठा साखळीत भारताचे मोठे योगदान आहे. संधी आपल्याकडे आहे. आपण ही संधी दवडायला नको. देशवासीयांकडे एक नीरक्षीर विवेकाचे सामर्थ्य आहे. समस्यांचे मूळ काय आहे हे समजण्याचे सामर्थ्य आहे. म्हणून 2014 मध्ये देशवासीयांनी एक स्थिर, मजबूत सरकार बनवले आणि तीन दशकांचा अस्थिरतेचा कालखंडातून मुक्ती मिळवली. देशाच्या संतुलित विकासासाठी प्रयत्न करणारे सरकार आज देशात आहे. राष्ट्राची प्राथमिकता सकारात्मक परिणाम निर्माण करत आहे. देशात मोठ्या स्तरावर कामे होत आहेत. समाजाच्या प्रत्येक वर्गाला न्याय देण्यासाठी विविध मंत्रालये तयार केली. देशाच्या कानाकोपर्यात लोकशाही मजबूत करण्यासाठी वेगळे सहकार मंत्रालय बनवले. सहकारातून समृद्धीचा मार्ग निवडला. 2014 मध्ये आपण वैश्विक अर्थव्यवस्थेत दहाव्या क्रमांकावर होते. आज आपण जगातल्या अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर पोहोचलो आहोत.
पंतप्रधान म्हणून मोदींनी सलग दहा वेळा लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनी भाषण करण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या दुसर्या कार्यकाळातील हे अखेरचे भाषण होते. मात्र पुढील वर्षीही मी लाल किल्ल्यावरून देशाच्या विकासाची माहिती देत असेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून लाल किल्ल्यावरून दहाव्यांदा देशाला संबोधित केलं आहे. ७६ व्या स्वातंत्र्यदिनाचे पंतप्रधानांचे भाषण ८३ मिनिटांचे होते. तर २०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८६ मिनिटांचे भाषण करून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणाचा रेकॉर्ड मोडला होता. पण आत्तापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीत फक्त एका वेळी एका तासापेक्षा कमी वेळेचे भाषण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ सालच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी त्यांच्या ८६ मिनिटांच्या भाषणाचा रेकॉर्ड तोडून सर्वांत मोठे म्हणजे तब्बल ९६ मिनिटांचे भाषण केले होते. तर २०१७ साली त्यांनी ५६ मिनिटे भाषण केलं होतं. हे त्यांच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत कमी वेळाचं भाषण होतं. पण यावर्षी त्यांनी लाल किल्ल्यावर ८९ मिनिटांचे भाषण केले आहे.