(खेड)
मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या गॅस टँकरला आग लागल्याची घटना मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात शनिवारी (२९ जुलै) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत चालक बचावला असून, टँकर रिकामा असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, महामार्गावर टँकरने पेट घेतल्याचे कळताच साऱ्यांची धावपळ उडाली. तब्बल दोन तासांनी ही आग आटोक्यात आली.
या घटनेची माहिती महाडचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ हालचाल केली. त्यांनी महाड नगर परिषदेचा बंब घटनास्थळी रवाना केला. तसेच महाड एमआयडीसीचा अग्निशमन बंबही घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी टँकरला लागलेली आग नियंत्रणात आणली. या घटनेची माहिती मिळताच महाड नगर परिषद प्रशासन, पोलादपूर पोलिस, पोलादपूर तहसीलदार आदी यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनास्थळापासून दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली होती.
या टँकरला लागलेली आग रात्री नऊच्या सुमारास आटोक्यात आणण्यात यश आले. त्यानंतर हा टैंकर क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आला आहे. त्यानंतर तब्बल दोन तासानंतर मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.