(कोल्हापूर)
राज्यभरात सर्वत्र गणेशोत्सवाचा अमाप उत्साह दिसून येत आहे. सार्वजनिक मंडळांपासून ते घरोघरी बाप्पांचे आगमन झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही गणेश उत्सवाचा वेगळाच रंग व थाटमाटपाहायला मिळत आहे . मात्र, यावेळी या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी गोलबोट लागल्याची घटना घडली आहे. बाप्पांना घरात आणताना पाय घसरुन पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बोलकेवाडी येथे ही घटना घडली.
सचिन शिवाजी सुतार असे मृत्यू झालेल्या गणेशभक्ताचं नाव आहे. सचिन सुतार हे सकाळी गणपती घेऊन घरी आले. घरात गणपती घेताना चौकटीला लागेल म्हणून ते खाली वाकले. मात्र, पाय घसरल्याने खाली पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला त्यातच त्यांनी आपला जीव गमावला. मुंबई येथे सुतारकाम करून उदरनिर्वाह करणारे सचिन हे दोन दिवसापूर्वी गणेशोत्सवासाठी गावी आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. गणेश चतुर्थी दिवशी घडलेल्या या दु:खद घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.