(आरोग्य)
आपल्याला बाळाला गरम जेवण फुंकर मारुन भरवायची सवय असेल तर ती तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. ही सवय मुलांच्या दातांसाठी घातक ठरत असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. त्यामुळे मुलांचे दात निरोगी ठेवायचे असतील तर अन्नावर फुंकर मारू नका. आपल्या बाळाचे पालनपोषण करण्याबाबत पालक खूप दक्ष असतात. बाळाला जेवण भरवताना त्याला चटका बसणार नाही यासाठी आई प्रत्येक घास हा फुंकर मारुन भरवत असते. मात्र या सवयीमुळे बाळाच्या दातांवर परिणाम होऊ शकतो. दात येण्यापूर्वीच मुलाचे दंत आरोग्य खराब होऊ शकते.
जर दातांमध्ये पोकळी असेल आणि बाळाचे जेवण फुंकून भरवत असाल तर तुमच्या तोंडातील किटाणू बाळाच्या तोंडात जाण्याची शक्यता असते. जेव्हा हे किटाणू संपर्कात येताच बाळाचे दात येण्यापूर्वीच दातांवर प्लाक जमा होण्यास सुरवात होते आणि त्यामुळे मुलांच्या दातात पोकळी निर्माण होते. ते किटाणू दातांना लागेपर्यंत जवळपास पाच ते सहा महिने लागतात. त्याचवेळी दात येण्याच्या वयात मुलांच्या दातांवर किटाणूची लागण होते.
काय काळजी घ्यावी :-
– बाळाला जेवण भरवताना त्यावर फुंकर न मारता पंख्याखाली किंवा वेगळ्या पद्धतीने ते थंड करावे.
– तुम्ही खाल त्याच चमच्याने बाळाला भरवू नका. तसेच एकाच ग्लासमधून पाणी पिऊ नका.
– जेवल्यानंतर बाळाचे तोंड ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या.
– तसेच बाळाची दातांबरोबरच त्याची जीभही दररोज हळुवार स्वच्छ करा.