( खेड )
मूल पळवून (चोरून) आणलेस तर तुला २० हजार रुपये मिळतील. ते मूल विकल्यावर तुझ्या खात्यात ३० हजार रुपये ट्रान्स्फर करेन, असे आमिष दाखवल्याने मुले पळवण्याचा इराद्याने गुणदे येथे आलेल्या एका संशयिताला ग्रामस्थांनी शनिवारी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी अन्य एकालादेखील अटक करण्यात आली. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
छोटूलाल अमरनाथ भारती (मूळ रा. बनारस, उत्तर प्रदेश, सध्या रा. आवाशी) असे पोलिसांनी पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. खेड येथील अन्य एक संशयित कृष्णा नामक इसमालाही या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रंगाराव शिवराम चव्हाण हे आवाशी-गुणदे येथे मागील गेल्या ४० वर्षांपासून लोहारकाम करतात. या ठिकाणी ते झोपडी बांधून कुटुंबासह राहतात. शुक्रवारी (ता. १४) रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास ते झोपले असता एक अनोळखी इसम येऊन त्यांच्या झोपडीबाहेरील दिवे विझवून घरात शिरण्याचा प्रयत्न करत होता. या वेळी त्यांच्या बहिणीला कुणीतरी झोपडीत शिरल्याची चाहूल लागली. त्यांनी आरडाओरडा करताच रंगाराव जागे झाले. क्षणात त्यांनी त्या अनोळखी इसमाला पकडले. आवाजाने शेजारील झोपडीत पत्नी व दोन वर्षांच्या मुलासह झोपलेला त्यांचा मुलगा सचिन तेथे आला. त्याने संशयित इसमाकडे चौकशी केली. तेव्हा त्याने आपल्याला एका इसमाने ५० हजार देण्याच्या बदल्यात मूल चोरण्यासाठी पाठवले, मूल नेऊन दिल्यावर २० हजार व ते विकून झाल्यावर ३० हजार तो मला देणार असेही सांगितले.
घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी अनोळखी व्यक्ती हे सांगत असतानाचे छायाचित्रण केले. ही माहिती पहाटे चव्हाण कुटुंबाने आवाशी सरपंच व उपसरपंच यांना दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन खात्री केली व पोलिसांना माहिती दिली. पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोचले.
या वेळी ग्रामस्थ जमा झाले होते. संशयिताने आपण मूल चोरण्याचाच प्रयत्न केला असल्याचे पोलिसांना सांगितले. याबाबत चव्हाण यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, त्या अनोळखी इसमाचे नाव छोटूलाल अमरनाथ भारती (मूळ रा. बनारस उत्तरप्रदेश, सध्या रा. आवाशी) असे असल्याचे उघड झाले आहे. त्याच्याविरोधात अपहरणाचा प्रयत्न, चोरीच्या इराद्याने घरात घुसणे आदीबद्दल गुन्हा दाखल केला आहे. यातील मुख्य सूत्रधाराचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती लोटे पोलिस दूरक्षेत्राचे अधिकारी यू. एस. भोसले यांनी दिली.