(संगलट / इक्बाल जमादार)
ऑक्टोबर महिन्यात मुरुड-श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची वर्दळ वाढेल, अशी आशा होती. परंतु ती सपशेल फोल ठरली. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देखील येथील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांचा शुकशुकाट आहे. मुरुड तालुक्यातील प्रसिद्ध काशीद बीच हा या सीझनमध्ये गजबजलेला असतो, परंतु या बीचवर पर्यटकांची वर्दळ दिसून येत आहे.
श्रीवर्धन येथील डॉ. आदित्य पाटील यांनी सांगितले की, गणेशोत्सव झाल्यानंतर देखील श्रीवर्धन परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर फारसे पर्यटक दिसून आले नाहीत. ऑक्टोबर महिन्याच्या शनिवारी, रविवारी देखील पर्यटकांचा मागमूस दिसून येत नाही. या हंगामात प्रसिद्ध काशीद बीचवर हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. जंजिरा किल्ला, मुरुड बीच श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर आदी समुद्रकिनारे फुलून जात असतात; परंतु सध्या पर्यटक समुद्र किनारपट्टीवर का आले नाहीत? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.
पर्यटकांमुळे त्याचा पर्यटन व्यवसायावर मोठा प्रतिकूल असा परिणाम दापोली तालुक्याला झाला आहे, तर मुरुड खराब रस्ते ठरताहेत पर्यटनाला अडथळा ठरत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर हाजारोंच्या संख्येने खड्डे अद्याप तसेच आहेत. या भागात अरूंद रस्ते आणि खड्डे असल्याने पर्यटक येण्यास टाळाटाळ करतात. आता दिवाळीच्या वेळी पर्यटकांची वर्दळ वाढेल, असा अनेकांचा अंदाज आहे.
श्रीवर्धन आणि मुरुड या तालुक्यांचे अर्थकारण पर्यटन व्यवसायाशी निगडित आहे. किनारी काही स्टॉल्स पर्यटकांअभावी बंद ठेवणे भाग पडले आहे. याला मुरुड येथील हिरा रेसिडेन्सीचे मालक महेंद्र पाटील यांनी देखील याला दुजोरा दिला आहे. परीक्षा सुरू असल्याने पर्यटक आले नसावेत, असे मत काही मंडळींनी व्यक्त केले आहे. नवरात्रात मुंबई, पुण्याचे भाविक पर्यटक कोल्हापूर, गोवा, सिंधुदुर्ग परिसरात देवदर्शनासाठी जाऊन रायगडच्या श्रीवर्धन, मुरुड, काशीद, नांदगाव, दिवेआगर बीचवर भेटी देऊन जात असतात, असा अनुभव आहे. मात्र यावेळी अनुभव वेगळा असल्याचे स्थानिकांनी सांगितले.