(साखरपा / दीपक कांबळे)
मुख्यमंत्र्यांच्या सभेला एसटी बसेस सोडल्याने नियमित प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलांसह प्रवाशांचे अतोनात हाल तर विशिष्ट पक्षाची खाजगी मालमत्ता समजून एसटी बसला झेंडे लावल्याने नागरिकामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आज (सोमवार, दिनांक ८ जानेवारी २०२३) राजापूर येथे मुख्यमंत्र्यांची सभा असल्याने देवरुख आजारातून 30 गाड्या तर जिल्ह्याभरातून एकूण 295 गाड्या सोडल्या गेल्या असल्याची माहिती देवरूप बस स्थानकातून उपलब्ध झाली आहे. विविध मार्गावर दररोज धावणाऱ्या गाड्या अचानकपणे बंद झाल्याने प्रवासी आणि शाळकरी बसची प्रतीक्षा करत होते. काही प्रवासी व मुले खाजगी वाहनांचा आधार घेऊन आपल्या कर्तव्यावर गेले. मात्र नियमित एसटी येण्याची वाट पाहून काहींनी घरी जाण्याचे पसंत केले. राजापुर येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी लोकांचे हाल कशासाठी? हेच का ते सामान्यांचे मुख्यमंत्री? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
रद्द करण्यात आलेल्या फेऱ्यांची माहिती केवळ बस स्थानकाच्या आवारात दिसून येते मात्र प्रत्यक्षात ज्या मार्गावर प्रवासी प्रवास करतात त्या गाव भागात कोणतीही माहिती नसल्याने प्रवासी व शाळकरी मुले अडकून पडल्याचे चित्र आहे. नियमित बारमान देणाऱ्या प्रवाशांची व शाळकरी मुलांची गैरसोय झाल्याने शासकीय यंत्रणेविरुद्ध नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.