(जालना)
नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर कोणती घोषणा करतात, त्यानुसार आपण आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार असल्याचे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी रविवारी जाहीर केले.
अंतरवाली सराटी गावात आज जरांगे यांनी सभेचे आयोजन केले होते. मात्र, यामध्ये कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. बीड जिल्ह्यात 23 डिसेंबर रोजी होणार्या सभेत आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री शिंदे अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार आहेत. आधी त्यांची भूमिका कळली पाहिजे, यासाठी हा निर्णय घेण्यात असल्याचे जरांगे म्हणाले.
24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठाम असल्याचा निरोप मिळाला आहे. आपण काय आंदोलन करणार आहोत, हे सांगितल्यास सरकार सतर्क होईल. आता लढाई ताकदीने आणि युक्तीने लढायची आहे. सरकारला त्यांची भूमिका जाहीर करू द्यावी, अन्यथा तुम्ही आधीच आंदोलन जाहीर केले, असे ते म्हणतील. बीड येथील 23 डिसेंबरच्या सभेत आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार असल्याचे जरांगे म्हणाले.
तसेच मराठा आरक्षण मिळेपर्यंत राज्यात नोकरभरती करु नये, असा मुद्दा त्यांनी बैठकीत मांडला. जरांगे पाटील यांच्या या मागणीला उपस्थित सर्वांनी होकार दर्शवला आहे. त्यामुळे आता नोकरभरती झाल्यास जरांगे पाटील काय भूमिका घेतील हे पाहणे महत्वाचे आहे. बैठकीत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या लेकरांना जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत या राज्यात नोकरभरती करायची नाही. जर, तुम्हाला नोकरभरती करायची असेल, तर मराठ्यांना काही हरकत नाही. मराठे कुणाच्याही लेकरांचं वाटुळं होऊ देणार नाही. पण, नोकरभरती करण्याचा निर्णय घेतांना मराठ्यांच्या सर्व जागा राखीव ठेवून नोकरभरतीचा निर्णय घ्या, तर आम्हाला मान्य आहे.