(मुंबई)
राज्यातील उच्चशिक्षित तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी मिळावी, यासाठी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री फेलोशिपसाठी निवड झालेल्या उमेदवारांना तब्बल ७५ हजार रुपये इतका पगार देण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून ही फेलोशिप बंद करण्यात आली होती. परंतु आता राज्य सरकारनं ही फेलोशिप पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेत नव्यानं अधिसूचना जारी करत तरुणांना अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रातील उच्चशिक्षित तरुणांना प्रशासनासोबत कामाचा अनुभव मिळावा आणि तरुणांमधील कल्पकतेचा वापर करून प्रशासकीय कामांना गती मिळावी, या उद्देशानं मुख्यमंत्री फेलोशिपची सुरुवात करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. येत्या ०२ मार्चपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असून ३ ते ५ मार्च दरम्यान मॉक टेस्ट आणि त्यानंतर ऑनलाईन परिक्षा होणार आहे. मुख्यमंत्री फेलोशिपसाठी ६० तरुणांची निवड करण्यात येणार असून त्यांना एका वर्षासाठी शासनाच्या विविध विभागांत काम करण्याची संधी मिळणार आहे. यादरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना तब्बल ७५ हजार रुपये इतका पगार देण्यात येणार आहे.
असे आहेत पात्रतेचे निकष
मुख्यमंत्री फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय २१ ते २६ वर्षांदरम्यान असायला हवं. उमेदवारानं कोणत्याही शाखेतील पदवी किमान ६० टक्क्यांसह उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय उमेदवाराला एक वर्षाचा प्रशासकीय कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे. अर्ज करताना उमेदवाराला दहावी-बारावी आणि पदवीची गुणपत्रिकेची माहिती द्यावी लागणार आहे.
मुख्यमंत्री फेलोशिपसाठी निवड झालेल्या तरुणांना नोकरी, व्यवसाय किंवा शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येणार नाही. फेलोशिपचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला शासनाच्या कायमस्वरुपी सेवेत सामावून घेतलं जाणार नाही. फेलोशिपच्या काळात उमेदवाराला ऑफिसच्या वेळा आणि आवश्यतेनुसार प्रवास करणं बंधनकारक असणार आहे. फेलोशिपसाठी निवड झालेल्या तरुणांना कोणत्या राजकीय कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही. निवड झाल्यानंतर तरुणांना त्यांच्या वैद्यकीय चाचणीचं प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे.
अर्ज भरण्यासाठी https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/index.html या लिंकवर क्लिक करा.