राजकारणात सध्या भोंगा मुद्यावरून जोरदार धुमशान सुरु आहे. सर्व पक्षीय नेते एकमेकांवर चिखलफेक करण्यात गुंतले आहेत. राज्यातील महागाई, विकास यावर बोलायला व तसे कार्य अमलात आणायला कोणत्याच नेत्याला फुरसत नाही. एमआयएमचे नेते अकबरुद्दी ओवैसी यांनी नुकताच औरंगाबाद दौरा केला. यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावरून संताप व्यक्त होत असून बरेच राजकीय पडसाद उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला आहे. सभेची सुरुवात हनुमान चालिसाने करणार की औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून? असा सवाल राणा यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
अकबरुद्दी ओवैसी यांनी महाराष्ट्रात येऊन औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाले आहे. विरोधकांनी या मुद्यावरून महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये आता रवी राणा यांचा देखील नंबर लागला आहे.
रवी राणा यांनी या पार्श्वभूमीवर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री आजच्या सभेची सुरुवात हनुमान चालिसाने करणार आहे की औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहून? असा खोचल सवाल रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
यावेळी रवी राणा म्हणाले, ओवैसी औरंगाबाद आले आणि कबर उघडून त्यावर फुले वाहिली. माझ्या राजकीय जीवनात त्या कबरीवर कोणी गेल्याचं मी ऐकलेलं नव्हतं. पण ठाकरे सरकार आल्यानंतर हे पहिल्यांदाच घडलं आहे. तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता. तर तुमच्या राज्यात असं कसं काय घडू शकतं? असा सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
तसेच रवी राणा म्हणाले, हनुमान चालिसा पठण केल्यामुळे आम्हाला तुरुंगात टाकले जाते. पण अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादमध्ये येऊन औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून जातात. आता देशातील प्रत्येक हिंदूचा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की, उद्धव ठाकरे हनुमान चालिसा वाचणार की औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणार?