(मुंबई)
महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच डीआरआयने मुंबईत कारवाईचा धडाका लावला असून, मागच्या काही दिवसांत मुंबईत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. दरम्यान, मुंबई विमानतळावर डीआरआयच्या पथकाने आणखी १५ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेले अमली पदार्था पॅरिसहून आणण्यात आले आहेत. तर ते नालासोपारा आणि लगतच्या परिसरात विक्रीसाठी नेण्यात येणार होते. मात्र, तत्पूर्वीच या प्रकरणाचा पर्दाफाश करीत डीआरआयने धडक कारवाई केली असून या प्रकरणी तिघांना अटक केली.
अमली पदार्थ कुरिअर पार्सलच्या रुपात मुंबईत पोहोचल्याची माहिती आहे. या पार्सलमध्ये सुमारे १.९ किलो अॅम्फेटामाइन नावाचा अमली पदार्थ आढळला आहे. डीआरआयने ही खेप जप्त केल्यानंतर आता या ड्रग्जच्या सिंडीकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या साखळीत देशी-विदेशी तस्करांची टोळी सामील असल्याचे डीआरआयचे म्हणणे आहे.
मुंबई विमानतळावर पोहोचलेले अमली पदार्थांचे पार्सल घेण्यासाठी एक नायजेरियन नागरिक आला होता. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने साखळीशी संबंधित अन्य व्यक्तीचे नाव सांगितले. त्याचवेळी डीआरआयने दुस-याला पकडले, तेव्हा त्याने तिस-याचे नाव सांगितले. अशाप्रकारे तीन आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी या साखळीतील उर्वरित सदस्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.