( मुंबई )
मागील तीन महिने पावसाळी हंगामात बंद करण्यात आलेली भाऊचा धक्का ते रेवस या सागरी मार्गावर १ सप्टेंबर पासून प्रवासी बोट सेवा सुरू होणार आहे. तर भाऊचा धक्का – मोरा दरम्यान पावसाळी हंगामात वाढविण्यात आलेला तिकिट दर २५ रुपयांनी कमी होणार आहे. यामुळे गणपती सणात सुरू होणाऱ्या सागरी प्रवासी वाहतूकमुळे अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय दूर होणार आहे.
मुसळधार पाऊस, समुद्रात उठणाऱ्या उंचच उंच लाटा यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून पावसाळी हंगामासाठी दरवर्षी भाऊचा धक्का-रेवस या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येते. गेटवे -मांडवा मार्गावरील स्पीडबोट आणि रो-रो बोटसेवा यांच्या तिकिट दरांपेक्षा सर्वसामान्यांना भाऊचा धक्का-रेवस या सागरी मार्गावरील प्रवास परवडतो. त्यामुळे हजारो सर्वसामान्य प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात.
१ जून ते ३१ ऑगस्ट या पावसाळी हंगामासाठी मोरा ते मुंबई जलप्रवासाचे दर २५ रुपयांनी वाढविण्यात आले होते. त्यामुळे एका फेरीचे ८० रुपये दर १०५ रुपयांवर गेले होते. याचा उरण ते मुंबई बोटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसत होता. त्याचप्रमाणे तीन महिन्यांपासून पावसाळी हंगामात बंद करण्यात आलेली रेवस – भाऊचा धक्का हा सागरी जलमार्गही १ सप्टेंबरपासून पूर्ववत सुरू होणार आहे. ऐन गणपती सण जवळ असताना सुरू होणाऱ्या प्रवासी वाहतूकमुळे अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय दूर होणार आहे. तसेच मोरा सागरी प्रवासही स्वस्त होणार असल्याने प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.