कोकण रेल्वेने येणार्या प्रवाशांचे स्क्रिनिंग अपेक्षेप्रमाणे होत नाही, अशा तक्रारी आहेत. बहुतेक प्रवासी थेट होम क्वारंटाईन होतात. त्यांची चाचणी होत नसल्याने त्यापैकी बाधित कोरोनाचे प्रसारक ठरू शकतात. हा धोका टाळण्यासाठी होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांच्या डाव्या हातावर, तर होम क्वारंटाईन असलेल्याच्या उजव्या हातावर शिक्का मारा. ते बाहेर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला दिले.
ते म्हणाले, जिल्ह्यात अपेक्षित लस उपलब्ध न झाल्याने 45 वरील लसीकरण बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे 45 वरच्या लोकांसाठी जास्तीत जास्त लस द्या, अशी मागणी शासनानेकडे केली आहे. हाफकिन नावाच्या कंपनीला लस तयार करण्यासाठी 55 कोटी रुपये शासनाने दिले आहेत. लवकरच मोठ्या प्रमाणात लस मिळेल. जिल्ह्याला 12 रुग्णवाहिका मिळणार आहेत. त्यासाठी अॅम्ब्युलन्स पोर्टलला पैसे भरले आहेत. काही दिवसात त्या जिल्ह्याला मिळतील. जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील लोकांना चांगल्यापद्धतीने लसीकरण व्हावे, यासाठी नियोजन केले जात आहे. म्हणून नोंदणी करूनच लसीसाठी केंद्रावर जावे. विनाकारण गर्दी करून कोरोना वाढीची केंद्र ठरू नये, याची दक्षता घ्या. आरटीपीसीआर चाचणीचा रेट शंभर चाचण्यामध्ये 15 टक्के आहे. अॅण्टीजेन चाचणीचा 32 टक्के आहे. अॅण्टीजेन चाचणी खात्रीशिर नाही, ती बंद करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
याबाबत उदय सामंत म्हणाले, अॅण्टीजेन चाचणीबाबत मी कोणताही दावा करणार नाही. मात्र माहिती घेऊन सांगतो. आरटीपीसीआर चाचण्या जास्तीत जास्त कराव्यात अशी मागणी आहे. जिल्हा रुग्णालयातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेवर ताण वाढल्याने दुसरे मशिन बसविण्याचे काम सुरू आहे. तीन ते चार दिवसात ते पूर्ण होणार आहे.