(रायगड / प्रतिनिधी)
मुंबई पुणे महामार्गावर खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबई लेन किलोमीटर ३८ च्या दरम्यान आज पहाटे आयशर टेम्पोला धडक दिली, या अपघातामध्ये चालकासह दोन जण मरण पावले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई पुणे महामार्गावर आज पहाटे मुंबईकडे जाणारा आयशर टेम्पो क्रमांक डी डी-०१ /एन-९४४६ या वाहनाची पुढे जात असलेल्या अज्ञात वाहनाला मागील बाजूने जोराने धडक बसली. ही धडक एवढी भयानक होती की त्यामुळे टेम्पोची केबिन पूर्णपणे दबून गेली होती. या अपघातामध्ये टेम्पोचा चालक अनिल लाखन गावीत (राहणार सिल्वासा, दादर नगर हवेली) याचा जागीच मृत्यू झाला . तसेच त्याच्याबरोबर असलेला अनिकेत बोरसा रा. सिल्वासा, दादर नगर हवेली हा गंभीर झाल्याने त्याच्यावर खोपोली येथील रुग्णालयात उपचार केले जात असताना तो मरण पावला.
अपघाताची माहिती मिळताच आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, मृत्युंजय देवदूत, बोरघाट वाहतूक यंत्रणा त्याचबरोबर सामाजिक संस्थेचे पथक अपघात स्थळी रवाना झाले .सर्वप्रथम त्यांनी केबिनमध्ये अडकलेल्या चालकाचा मृतदेह बाहेर काढला, त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या अनिकेतला उपचारासाठी रवाना केले. अपघात ग्रस्त आयशर टेम्पो रस्त्याच्या बाजूला काढण्यात येऊन वाहतूक सुरू करण्यात आली. या अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पोलीस निरीक्षक शितल राऊत पुढील तपास करीत आहेत