(पुणे)
मावळ परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कामशेत बोगद्याच्या तोंडावर मुंबई मार्गिकेवर दरड कोसळली. गुरुवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. अगोदर कोसळलेला राडारोडा हटवून आजच या मार्गावर वाहतूक सुरू झाली होती. मात्र, या मार्गावर पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली.
कामशेतचा मोठा बोगदा संपल्यानंतर मुंबईकडे जाणा-या मार्गावर ही दरड आल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काहीशी विस्कळीत झाली. खंडाळा घाटातील धोकादायक दगड काढण्याचे काम झाल्यानंतर काल दुपारी अडीच नंतर एक्स्प्रेस वेची मुंबई मार्गिका सुरु करण्यात आली होती. मात्र, या घटनेमुळे मुंबई मार्गिका पुन्हा विस्कळीत झाली आहे. घटनेची माहिती समजताच एक्स्प्रेस वेवरील देवदूत यंत्रणा आणि आयआरबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मार्गावर आलेले दगड आणि माती बाजूला काढण्याचे काम सुरू करण्यात आले.
बोरघाट येथे काल दरड काढण्यासाठी १२ ते २ ब्लॉक घेण्यात आला होता. मुंबईकडे जाणारी संपूर्ण वाहतूक थांबवण्यात आली होती. ड्रिल मारून या दरडी पाडण्यात आल्या. नागरिकांना याचा कोणताही त्रास होऊ नये, म्हणून प्रशासन सतर्क झाले होते. मात्र, काल रात्री पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली.
गेल्या तीन-चार दिवसांपासून या मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. परवा दोन तास महामार्ग बंद ठेवत दरडग्रस्त धोकादायक ठिकाणांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. चार दिवसांपूर्वीही याच एक्स्प्रेस वेवर दरड कोसळली होती. मोठ्या प्रमाणावर राडारोडा रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. आडोशी गावाच्या हद्दीत रविवारी रात्री दरड कोसळली होती.
२ वर्षांत ६५ कोटींचा खर्च
पुणे-मुंबई द्रुतगतीवर दरड कोसळू नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या दोन वर्षात यासाठी तब्बल ६५ कोटींचा खर्च झाला आहे. २०१५ पासून हा आकडा १०० कोटींच्या आसपास झाला आहे. मार्गावर दरड कोसळू नयेत, म्हणून डोंगरांच्या कातळकडांना जाळ्यांचे संरक्षण देण्यात आले आहे. पण या जाळ्या निकृष्ट दर्जाच्या होत्या, असे सिद्ध झाले आहे. आता त्याच ठिकाणी नव्याने जाळ्या लावल्या जात आहेत.