(संगमेश्वर / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रात धामणी आणि गोळवली गावामध्ये नदीच्या बाजूला संरक्षण म्हणून ठेकेदार कंपनीने तात्पुरती रेलिंग उभारावीत, अशी मागणी संगमेश्वरवासीयांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातानंतर ठेकेदार कंपनी आणि बांधकाम विभागाने जागरूकता म्हणून हे काम त्वरित हाती घेण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
संगमेश्वर ते आरवली या अपघातप्रवण क्षेत्रात धामणी आणि गोळवली या ठिकाणी वारंवार अपघात होतात. चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्त्याची खोदाई करण्यात आली आहे तसेच जोडरस्तेही खराब झाले आहेत. त्यामुळे खड्डा चुकवत असताना गाड्या नदीमध्ये कोसळण्याची शक्यता असते. या ठिकाणी शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणारे विद्यार्थी आणि प्रवासीसुद्धा याच ठिकाणी उभे असतात. त्यामुळे या विषयाची गंभीरपणे दखल घेतली जावी आणि नदीकाठच्या बाजूला रेलिंग उभारण्यात यावीत, अशी मागणी होत आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातानंतरही बांधकाम विभागाला जाग येईल का, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.