गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याची कबुली देत आगामी गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण लक्षात घेऊन २५ ऑगस्टपर्यंत हा महामार्ग खड्डेमुक्त केला जाईल. याशिवाय आपण स्वतः दौरा करून या महामार्गाची पाहणी करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. पुढील वर्षी म्हणजे मे २०२३पर्यंत कशेडी तसेच परशुराम घाटाचेही काम पूर्ण केले जाईल. तत्पूर्वी कशेडी आणि परशुराम घाट परिसरातील मातीचे टेरीकडून परीक्षण केले जात आहे. त्यानंतर टेरीच्या सल्ल्यानुसार या मार्गात उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
महामार्गावर १० वर्षात १५१२ मृत्यू
मुंबई – गोवा महामार्गाचे काम मागील १२ वर्षे रखडले आहे. या महामार्गावर २०१२ ते २०२२ या १० वर्षात ६ हजार ६९२ अपघात झाले असून १५१२ जणांचे बळी गेले आहेत. इतकी वर्षे लोटली तरी या महामार्गाचे काम का पूर्ण झाले नाही, असा सवाल सुनील प्रभू यांनी केला. कोकणी माणसाचा महत्त्वाचा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी आता गावी जायला निघाले आहेत. अशा स्थितीत गेल्या कित्येक वर्षांपासून काम सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे या मार्गाला लागून असलेल्या ठाणे, बेलापूर महामार्गावरही खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढल्याने या मार्गाचे काम कधी होणार, असा सवाल सुनील प्रभू, भास्कर जाधव यांनी केला होता.