(संगमेश्वर)
मुंबई – गोवा महामार्गाच्या रखडपट्टीबाबत जनआक्रोश समितीच्यावतीने सोमवार दि. २० मार्च रोजी आझाद मैदान येथे आयोजित आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे महिती मुख्य प्रवक्ते ॲड. ओवेसे पेचकर यांनी दिली
सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्री. रवींद्र चव्हाण यांनी लक्ष्यवेधीला उत्तर देताना पुढील ९ महिन्यात आपल्या महामार्गाचे काम गतिमान होईल, असे उत्तर भर सभागृहात दिलेले आहे. सकाळी त्यांनी कोकणातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते, यांची तातडीची बैठक घेतली.
या बैठकीला आपल्या जनआक्रोश समितीला उपस्थित राहून सुस्पष्ट मत मांडण्याचा अधिकार दिला. हे आपल्या आंदोलनाचे प्राथमिक यशच आहे. आपणही आपली जोरकस भूमिका मांडली. कासू ते इंदापूर हे दुरुस्तीचे सुरू झालेले काम बंद पाडण्याचे गलिच्छ राजकारणही केले गेले. हे आम्ही जोरकसपणे निदर्शनास आणले. त्यानंतर खऱ्या अर्थाने चर्चेला जोर चढला आणि केवळ पळस्पे ते इंदापूर नाही, तर अर्धवट अवस्थेत असलेल्या पळस्पे ते राजापूर पर्यंतच्या रस्त्याबाबत उपस्थित त्या त्या मतदार संघातील लोकप्रतिनिधींनी जोरदार चर्चा केली. खऱ्या अर्थाने मुंबई गोवा महामार्ग हा आता पूर्ण करण्याचीच लोकप्रतिनिधी आणि मंत्री महोदय यांची त्याबाबत उत्सुकता दिसली. याच बैठकीत ठेकेदारांना येणाऱ्या स्थानिक अडचणींबाबत विचारविनिमय झाला आणि मंत्री महोदयांनी त्या अडचणी सोडविण्याबाबत संबंधितांना आमच्याच समोर आदेश दिले. हे आम्हाला चित्र आक्रमक आणि आशादायी आज तरी वाटते आहे. त्याहूनही अतिमहत्त्वाच्या म्हणजे आपल्या जनआक्रोश आंदोलनाची तारीख नक्की केल्याचा उल्लेख असल्याचा संदेश आणि स्मरणपत्र विभागीय कोकण आयुक्त यांच्या कार्यालयात पोचताच त्यांनी आपल्याला २० मार्च रोजी दुपारी २ वाजता कोकण भवन, सी बी डी बेलापूर येथील कार्यालयात बैठकीचे आयोजन करून आपल्या जनआक्रोश समितीला चर्चेसाठी निमंत्रित केल्याचे पत्र तातडीने धाडले.
या बैठककीच्या पत्राचे आपण नीट अवलोकन केल्यास आपल्या लक्षात येईल रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, विशेष पोलिस महानिरीक्षक कोकण विभाग नवी मुंबई, मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, हे महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्याशीच थेट चर्चा करण्याची संधी आम्हाला यामुळे मिळाली आहे, असे ॲड. पेचकर यांनी सांगितले.
शासन आणि प्रशासन यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही आंदोलन स्थगित करीत असलेले आंदोलन जर का नेहमीप्रमाणे आश्वासन देऊन फसवणूक करण्याचा कपाळ करंटेपणा कराल, तर गेली १२ वर्षे आपापल्यापरीने आंदोलन करणाऱ्या शक्ती आज जन आक्रोशच्या माध्यमातून एकवटलेल्या असून ही शक्ती दिसेल, असा इशाराही दिला आहे.
दरम्यान, दि. २० मार्चला दुपारी २ वाजता सीबीडी बेलापूर येथे विभागीय कोकण आयुक्तांना ठणकावून सांगण्यासाठी सर्व कामे बाजूला ठेवून सर्वांनी कोकण भवन येथे सोमवार दि. २० मार्च, २०२३ रोजी दुपारी १.३० वाजेपर्यंत उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.