(पनवेल)
मनसेप्रमुख राज ठाकरेंनी बुधवारी पनवेलमध्ये निर्धार मेळावा घेतला आणि त्यांनी मनसैनिकांना फर्मान सोडले की, मुंबई-गोवा महामार्गासाठी पनवेलपासून सिंधुदुर्गपर्यंत असे आंदोलन करा की सरकार खडबडून जागे होईल. या ललकारीनंतर मनसैनिकांनी लगेचच आंदोलन सुरू केले.
मी फक्त आंदोलनाला हिरवा झेंडा दाखवायला आलो आहे. जे चांद्रयान चंद्रावर गेले त्याचा काय उपयोग आहे? तिथे जाऊन खड्डेच बघायचे तर महाराष्ट्रात यान आणायचे होते. इथे फक्त मुंबई गोवा मार्गावरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात खड्डे आहेत. हे खड्डे आज पडले नाहीत. 2007 साली मुंबई गोवा रस्त्याचे काम सुरू झाले. अनेक सरकारे त्यानंतर आली. मात्र आजही लोकं खड्ड्यातूनच जात आहेत. तुम्ही मात्र त्याच त्याच लोकांना निवडून देता. त्यांना धडा शिकवावा, घरी बसवावे असे वाटत नाही का?
भाजपा आम्हाला म्हणते की, एक रस्ता बांधून दाखवा. टोल बसवून दाखवा. मी त्यांना म्हणतो की दुसर्यांचे पक्ष न फोडता स्वतःचा पक्ष उभा करायला शिका आधी पहिले शिका. कानपट्टीवर बंदूक ठेवणार आणि मग हे लोक गाडीत झोपणार, मोदींनी भ्रष्टाचार काढल्यावर आले सगळे इकडे. भुजबळांनी सांगितले असणार तिथले अनुभव, इकडे थांबा, तिकडे नको. तरी त्यांना निवडून देता? या गोष्टी सुधारायच्या असतील तर माझ्या हातात सत्ता द्या.
पावसाळा आला की पत्रकार सगळीकडचे खड्डे दाखवतात. पण नाशिकचे खड्डे असे आम्ही बांधले की एक खड्डा नाही, म्हणजे रस्ते चांगले होऊ शकतात. मी गडकरींना फोन केला की, समृद्धी महामार्गावर कुंपण घातले नाही. लोक वेगाने जातात, मध्ये गाई येतात, हरणे येतात. कुंपण नाही, पण टोल मात्र सुरू केला. अशी सरकारे असतात का?
मुंबई – गोवाबद्दल मी गडकरींशी बोललो. रत्नागिरीला जायचे तर मुंबई ते सातारा जाऊन खाली यावे लागते. हा यु टर्न घ्यावा लागतो. आतापर्यंत या मार्गासाठी 15 हजार 566 कोटी रुपये खर्च झाले आहेत. अजून रस्ता झालेला नाही. नितीनजी म्हणतात कंत्राटदार पळून गेले, काही कोर्टात गेले. याच्या मागे काही कारण नाही ना? कारण कोकणच्या जमिनी धडाधड विकल्या जात आहेत. नाणार रद्द होतोय म्हटल्यावर लगेच बारसू आले. पाच-पाच हजार एकर जमीन कुणी विकत घेतलंय? आपलीच लोकं आहेत. 2024 पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल म्हणतात. आता गणपतीत जे जाणार त्यांचे काय? याचे एकमेव कारण म्हणजे त्यांना माहीत आहे की, भलत्या विषयावर त्यांना मतदान होणार आहे. हा धंदा आहे. रस्ता नीट केला तर पैसे टेंडरमधून कसे खायचे?
आज जे खोके खोके ओरडतात त्यांच्याकडे कंटेनर आहेत. बाळासाहेबांचे नाव पुढे करून मते घेणार आहेत. पुणे बरबाद होणार आहे. पाच पुणे झाले आहेत. तिथे पुणेकर गुदमरला आहे. कोण येतंय कोण जातंय पत्ता नाही. गोव्यात कायदा केला की शेतजमीन घ्यायची तर शेतीच करावी लागेल. तिथे भाजपाचे राज्य आहे. ते असा कायदा करतात. आम्ही गोव्याचा गुडगाव होऊ देणार नाही. म्हणजे उत्तरेतील लोकांना येऊ देणार नाही. मी बोललो तर मात्र देशद्रोही. काश्मीरमध्ये जमीन घेता येते कारण 370 कलम काढले. पण हिमाचल, मिझोराम मध्ये जा तिथे जमीन घेता येत नाही. काही राज्यांना वेगळे कायदे, काही राज्यांना वेगळे कायदे आहेत. पुण्यात मेट्रो सुरू केली, पण कुणी बसत नाही. पुढचा विचारच नाही. शिवडी-न्हावाशेवा सुरू झाला की रायगड अडचणीत येणार. समृद्धी महामार्ग चार वर्षांत होतो, मग कोकणातील आमदार खासदार काय करतात? पनवेल ते सावंतवाडी पर्यंत सर्व मनसैनिकांना रस्त्यावर उतरावे लागेल. हे करताना लोकांना त्रास होता कामा नये. आपल्या जमिनी कोण पळवतात त्याकडेही लक्ष द्या. कोकणचे सौंदर्य राखून उद्योग आणावे. लवकरात लवकर आंदोलन सुरू करावे आणि सरकारला जाग आणावी.
राज ठाकरे यांनी आपल्या निर्धार मेळाव्यानंतर मुंबई गोवा महामार्गावरील पळस्पे फाट्याची पाहणी केली. त्यानंतर काही वेळातच मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत माणगावमधील चेतक सनी या कंत्राटदार कंपनीचे कार्यालय फोडले. कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करीत जोरदार घोषणाबाजी केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावरही आंदोलन सुरू केले. मनसेचे स्थानिक पदाधिकारी जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्त्यांनी खड्ड्यात वृक्षारोपण करून घोषणा दिल्या. या आंदोलनामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती.