(संगमेश्वर / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावर सध्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. संगमेश्वरातील तुरळ ते शास्त्रीपूल दरम्यान मोर्या टाकण्याचे काम सुरु आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता ठेकेदाराने पाऊ स 4 दिवसांवर येऊ न ठेपलेला असताना दोन दिवसांपासूनच मोर्यांच्या कामाला सुरुवात केली आहे. येथील माती ट्रक, ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर टाकली जाते. त्यामुळे रस्त्यावर माती पडलेली आहे. मोर्या टाकताना पर्यायी कच्च्या रस्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र कालच्या पावसामुळे या रस्त्यावर पाणी आल्यामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
या चिखलातून प्रवास करताना दुचाकी घसरल्याच्या घटनाही घडल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार वाहन चालकांचा जीव जाण्याची वाट पाहत आहेत. ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आधीच कित्येक वर्षे महामार्गाचे काम चालू आहे. त्यामुळे उन्हाळ्यात धुळीचा सामना करावा लागतो तर पावसाळ्यात चिखलाचा सामना करावा लागत असल्याने वाहन चालक ठेकेदाराच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्यांनी वेळीच लक्ष देवून यावर योग्यत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.