(लांजा)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गाच्या रखलेल्या कामाबाबत पायी पदयात्रा काढण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, राज साहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणांनी रविवारी २७ ऑगस्ट रोजी लांजा शहर परिसर दणदणाला. मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणवासीयांना होणारा त्रास लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सकाळी सात वाजता लांजा तहसील कार्यालय ते वेरळ अशी पायी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेच्या माध्यमातून सरकार आणि प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मनसेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष मनीष पाथरे यांनी यावेळी दिली.
मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे प्रवासी, कोकणातील नागरिक आणि पर्यटक यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून आजवर या महामार्गावर प्रवास करणाऱ्या अनेकांना प्राण गमावावे लागले आहे. म्हणूनच लोकशाही पद्धतीने याचा निषेध करून सरकारला जाग आणण्याच्या दृष्टीने रविवारी सकाळी सात वाजता लांजा तहसील कार्यालय येथून ही पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये मनसेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष तथा मनसेचे उपाध्यक्ष मनीष पाथरे यांच्यासह रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, पक्षाचे नेते अविनाश अभ्यंकर, पक्ष सरचिटणीस नयन कदम या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह लांजा राजापूर तालुका पदाधिकारी तसेच मुंबईकर पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लांजा पोलीस ठाण्यामार्फत मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आला होता.