(अहमदाबाद)
हार्दिक पांड्याच्या गुजरातने रोहित शर्माच्या मुंबईचा ५५ धावांनी पराभव केला. २००८ धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संघ निर्धारित २० षटकात ९ विकेटच्या मोबदल्यात १५२ धावांपर्यंत मजल मारू शकला. गुजरातच्या फिरकीच्या जाळ््यात मुंबईचा संघ अडकला. राशिद खान आणि नूर अहमद यांनी मुंबईच्या पाच फलंदाजांना तंबूत पाठवले. गुजरातचा ७ सामन्यांत हा पाचवा विजय ठरला. त्यामुळे गुजरातने गुणतालिकेत दुस-या क्रमांंकावर झेप घेतली आहे. दुसरीकडे मुंबईच्या संघाचा ७ सामन्यांत चौथा पराभव झाला.
२०८ धावांचा पाठलाग करणा-या मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने रोहित शर्मा याला २ धावांवर झेलबाद केले. अवघ्या ४ धावांवर मुंबईला पहिला धक्का बसला. त्यानंतर मुंबईचा डाव सावरण्याची जबाबदारी ईशान किशन आणि कॅमरुन ग्रीन यांच्या खांद्यावर आली. पण २०८ धावांचा पाठलाग करताना ईशान किशन अतिशय संथ फलंदाजी करत होता. त्याचा स्ट्राईक रेट १०० इतका सुद्धा नव्हता. ईशान किशनला राशिद खानने तंबूचा रस्ता दाखवला. ईशान किशन याने २१ चेंडूत फक्त १३ धावांचे योगदान दिले. त्यानंतर इतर फलंदाजही फार कमाल करू शकले नाहीत.
तत्पूर्वी शुभमन गिल याचे दमदार अर्धशतक आणि डेविड मिलर आणि अभिनव मनोहर यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर गुजरातने निर्धारित २० षटकात ६ विकेटच्या मोबदल्यात २०७ धावांपर्यंत मजल मारली. गिलने ५६ धावांची खेळी केली तर डेविड मिलरने ४६ तर मनोहरने झटपट ४२ धावांची खेळी केली. अखेरीस राहुल तेवातिया याने तीन षटकार लगावत गुजरातची धावसंख्या २०० च्या पुढे नेली. त्यामुळे मुंबईसमोर विजयासाठी २०८ धावांचे आव्हान ठेवले होते. परंतु मुंबईच्या संघाला दीडशेचाच आकडा गाठता आला.