(मुंबई)
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी छापेमारी बाबत दोन मोठ्या कारवाया केल्या. त्यामध्ये नालासोपा-यातील पतसंस्थेच्या मालमत्तेवर टाच आणली, तर मुंबईसह तीन शहरांत शेअर दलालांवर छापे टाकण्यात आले आहेत.
पहिली कारवाई नालासोपारा येथे मुख्यालय असलेल्या श्री खेतेश्वर अर्बन क्रेडिट को.ऑप सोसायटीच्या ३ कोटी ५१ लाख ०९ हजार ५२४ रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली गेली. या पतसंस्थेने नियमबाह्य पद्धतीने ठेवी स्वीकारून नियमबाह्य कर्ज वाटप केले. त्यात रकमेचा गैरव्यवहार झाल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली.
दुसरी कारवाई ‘ईडी’ ने मुंबई, दिल्ली व चेन्नईत एकाचवेळी केली. शेअर बाजारात प्रविष्ट असलेल्या सेक्युरेक्लाऊड टेक्नॉलॉजिस लि., क्वॉंटम ग्लोबल सेक्युरिटीज लि. व प्रो फिन कॅपिटल लि., या कंपन्यांसह युनिटी ग्लोबल फायनान्शियल प्रा. लि. व डेझर्ट रिव्हर कॅपिटल प्रा. लि., या शेअर दलाल व वित्त सेवा कंपन्यांशी संबंधी १६ ठिकाणी छापे टाकण्यात आले.
शेअर बाजारातील गुंतवणुकीद्वारे काही रोखीने व्यवहार केल्याचा संशय ‘ईडी’ ला आहे. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली. यामध्ये १.०४ कोटी रुपयांची रोख, सोने व हि-याचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच ३० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता टाच आणण्यासाठी निश्चित करण्यात आली आहे. काही दस्तावेज व इलेक्ट्रिकल गॅझेटदेखील जप्त करण्यात आले आहेत.