जो कोणी मुंबईला महाराष्ट्रा पासून तोडत असेल, त्याच्या शरीराचे ५ तुकडे करू ! आम्ही आरेची ठेवलेली जागा यांनी सरकार स्थापन झाल्या झाल्या मेट्रोला दिली. कोविड सेंटरची जागा बुलेट ट्रेनला दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटली होती. तुम्ही मुंबई लुटत आहात. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. तिला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला, तर तोडणाऱ्यांच्या शरीराचे ५ तुकडे करू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ते २४ ऑक्टोबर या दिवशी शिवतीर्थ येथे झालेल्या दसरा मेळाव्याला संबोधित करत होते.
मुंबईचे सगळे उद्योग-धंदे गुजरातला नेले. आता फिल्म सिटीही उत्तरप्रदेशला नेणार आहेत. मुंबईच्या हक्काचे नेणार असाल, तर तुम्हाला मुंबईत गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही. धारावीत १५० कोटी फुटाचा fsi धारावीत मिळणार आहे. धारावीचा विकास झाला पाहिजे; पण त्याचा फायदा मराठी माणसाला झाला पाहिजे. प्रत्येक घरात असलेल्या उद्योग-धंद्यांना जागा मिळाली पाहिजे. आजही गिरणी कामगाराचा मुलगा वणवण फिरत आहोत, त्याला धारावीत घर मिळावे. मी धारावी त्यांना गिळू देणार नाही. आम्हाला हिंदुत्व जपत मुंबईवरील मराठी ठसा ठळक करायचा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ज्या महाराष्ट्राने, मुंबईने कोरोनामध्ये अतुलनिय काम केले तिला बदनाम केले जात आहे. अरे दरिद्री लोकांनो, मुंबई देशाची आर्थिक राजधानी असताना ती लुटली जात आहे आणि बुट चाटणारे ते होऊ देतात पण असे केल्यास आम्ही गाडून टाकू. कोरोना काळातील घोटाळ्याची चौकशी करायची असेल तर सगळ्या महापालिकांची चौकशी करा, आणि हो नागपूर बुडवून दाखवले त्या उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या त्या नागपूरचीही चौकशी करा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला.
मी मनोज जरांगे पाटील यांना धन्यवाद देत असल्याचे सांगून उद्धव ठाकरे यांनी त्यांचे समजुतदारपणे आंदोलन सुरू आहे. त्यांनी आज चांगली गोष्ट केली, त्यांनी धनगरांना साद घातली. आताचे डायरचे सरकार आहे. अंतरवालीमध्ये यांनी पाशवी लाठीचार्ज केला. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही हे आंदोलन सुरू होते. पण एकाने तरी सांगावे की मी कधी लाठीमाराचा आदेश दिला होता का. तेच पोलिस आहेत. आदेशाशिवाय ते इतके वेडेवाकडे वागू शकत नाहीत. जालन्याचा डायर कोण आहे याची काहीच चौकशी नाही, अशा शब्दांत हल्लाबोल केला.
जातीपातीच्या भिंती उभ्या करून झुंजविण्याचे भाजपाचे कारस्थान मोडून टाकायचे आहे. मराठा म्हणजे मराठी एका मातीची लेकरं आहोत. भाजपा कपटी आणि विघ्नसंतोषी आहे. कोणाचेही लग्न असो पंगतीला जाणार आडवा हात मारणार. पुरणपोळया फस्त करणार. पण निघताना नवरा-बायकोत भांडणे लावून दुस-या लग्नाला जेवायला जाणार. हे जिथे जातील तिथे सत्यानाश करतात, असा हल्लाबोल त्यांनी केला. आता आगामी निवडणुकात विरोधकांच्या राजकीय कोथळा काढणार, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर घणाघाती टीका केली. आमचे हिंदुत्व हे मातीशी जोडलेले हिंदुत्व आहे, ते शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही, असे म्हणत त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली.
शेतकरी वा-यावर, आरक्षणासाठी समाज रस्त्यावर आणि हे म्हणे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहेत. इंडिया आघाडी केली, त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, इंडियन मुजाहिदीन आहेत. आमची तुलना मुजाहिदीनसोबत केलीत. बाळासाहेब पाकिस्तान जोपर्यंत हल्ले थांबवत नाही, तोपर्यंत त्याच्यासोबत मॅच होऊ देणार नाही असे आदेश द्यायचे. आज गुजरातमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचे असे स्वागत केले की त्यांना वाटले की ते भारतात नाही तर भाजपात आले. आमची तुलना देशद्रोह्यांसोबत करताना देशद्रोह्यांशी क्रिकेट खेळणार असाल तर देशद्रोही तुम्ही आहात, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.