(रत्नागिरी)
हॉटेलमध्ये थांबलेल्या वृद्धाने आपले एटीएम कार्ड, पिन क्रमांक वेटरकडे दिला. मात्र, त्याच वेटरने वृद्धाचा खून करून त्याच्याच पैशाने ऐश केल्याचा प्रकार समोर आला आहे. हत्या केल्यानंतर एटीएममधून पैसे काढण्यासाठी तो रत्नागिरीत आला होता. येथे पैसे काढल्यानंतर गोवा मार्गे तो नेपाळला पळून गेला होता. त्याला अटक करण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे.
ठाणे शहरातील एका हॉटेलमध्ये काराभाई रामभाई सुवा हे वृद्ध उतरले होते. याच हॉटेलमध्ये राजन शर्मा हा वेटर काम करत होता. सुवा यांच्याकडे रोकड नव्हती. त्यांना पैशाची आवश्यकता असल्याने त्यांनी विश्वासाने वेटर राजनकडे एटीएम कार्ड, पिन नंबर दिला. यावेळी त्यांच्या बँक खात्यात खूप पैसे असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने दि. २७ मे २०२३ रोजी काराभाई रामभाई सुवा या ज्येष्ठ नागरिकाचा गळा धारदार शस्त्राने चिरुन हत्या केली होती. त्यानंतर राजन तेथून पळून गेला होता. हत्या केल्यानंतर त्याने एटीएमसह थेट रत्नागिरी गाठले. येथे त्याने एटीएममधून विविध ठिकाणांहून ८० हजार रुपये काढले. त्यानंतर तो गोव्याच्या दिशेने पळून गेला. गोव्यातून थेट उत्तर प्रदेशला पोहोचला. तेथूनही तो नेपाळला पळून गेला होता.