(मुंबई)
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मुंबई, महाराष्ट्रातील विकास रखडला होता. प्रकल्पांची कामे बंद होती. मात्र, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर या विकासकामांना, प्रकल्पांना वेग आला आहे, असे स्पष्ट करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपचाच महापौर विराजमान होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबईचे अध्यक्ष आशीष शेलार आदी उपस्थित होते.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जे. पी. नड्डा हे बुधवारी मुंबईत आले. आपल्या दिवसभरच्या व्यस्त दौऱ्यात त्यांनी कांदिवली येथे पक्षाच्या पन्नाप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना नड्डा यांनी कार्यकर्त्यांना आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा विजयी होईल, असा विश्वास दिला. भाजपा हा एकमेव असा पक्ष आहे ज्याचे वैचारिक अधिष्ठान आहे. भाजपामध्ये एक साधा कार्यकर्ता देखील देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान होऊ शकतो. इतर पक्ष हे कौटुंबिक आहेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे असतील वा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस असेल हे कौटुंबिक पक्ष आहेत, अशी टीका नड्डा यांनी केली.
Addressing Panna Pramukhs meeting in Kandivali West Mumbai, Maharashtra. https://t.co/seJnhoHomF
— Jagat Prakash Nadda (Modi Ka Parivar) (@JPNadda) May 17, 2023
देशात भाजपा हाच पक्ष वाढेल, असे जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा विरोधीपक्षांना झोंबते. विरोधी पक्षात कोणाकडे नेता आहे? नेता आहे पण नीती नाही, नीती आहे तर नियत नाही आणि नियत आहे, पण नेता नाही. काहींकडे तर कार्यकर्तेच नाहीत. भाजपा हा एकमेव पक्ष आहे ज्याच्याकडे नेता, नीती, नियत आणि कार्यक्रम, कार्यकर्ता तसेच ताकदही आहे. भाजपा हा एकमेव पक्ष आहे जो सर्व ठिकाणी, सर्व समाजात आहे. इतर पक्ष आता वैचारिकतेपासून दूर चालले आहे. त्यामुळे अनेक पिढ्या बदलल्या, पण आपला विचार आणि मुद्दे आम्ही बदलले नाहीत, असे नड्डा म्हणाले.