भाजप आमदाराच्या नावाने बनावट फेसबूक अकाऊंट तयार करून महिलांना मॅसेज पाठवण्याचा प्रकार उघडीकस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ठाण्यातील ओला कारचालकाला अटक केली. रविवारी (०९ जुलै २०२३) दुपारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चंदन सुभाष शिर्सेकर (वय, २८) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे
मिळालेल्या माहितीनुसार, चंदन हा ठाण्यातील कोसळेवाडी येथील रहिवासी असून ओला कारचा चालक म्हणून कार्यरत आहे. त्याने काही दिवसांपूर्वी आमदार गायकवाड यांच्या नावाने बनावट फेसबूक अकाऊंट तयार केले. त्यानंतर या अकाऊंटच्या माध्यमातून महिलांना फ्रेन्ड रिक्वेस्ट आणि हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, तुम्ही भेटू शकतात का? असे मॅसेज पाठवायला सुरुवात केली. त्यापैकी एका महिलेने थेट आमदार गणपत गायकवाड यांना तुम्ही मला फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली का? अशी विचारणा केली आणि हा संपूर्ण प्रकार उजेडात आला.
दरम्यान, कोणीतरी आपल्या नावाचे बनावट अकाऊंट तयार करून महिलांना मॅसेज करत असल्याचे आमदार गणपत गायकवाड यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरीत याबाबत जिल्हा शहर पोलीस आयुक्त जयजित सिंह यांच्याकडे तक्रार केली. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि आरोपी चंदनला अटक केली. चंदन हा इयत्ता दहावीपर्यंत शिकला आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या जाळ्यात अकडला जाऊ नये म्हणून तो दुसऱ्यांचा हॉटस्पॉट आणि वायफायचा वापर करत असे.
या संपूर्ण प्रकरणावर आमदार गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, चंदन हा शिकलेला नाही. कोणाच्या तरी सांगण्यावरुन त्याने हा प्रकार केल्याचा अंदाज आहे. माझी बदनामी करण्याचा अनेकांचा उद्देश आहे.