संगमेश्वर/प्रतिनिधी
मुंबई येथे फायनान्स कंपनीची १५ वर्षांची नोकरी सोडून संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी येथील पदवीधर तरुणाने गावी येत पशुपालनाचा व्यवसायात यशस्वी भरारी घेतली आहे. विलास तुकाराम मिरगल असे या तरुणाचे नाव असून तो संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी गवळीवाडी येथील तरुण आहे. त्याची व्यवसायातील जिद्द नक्कीच कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे.
गायीचे दूध, तूप हे आरोग्यदायी समजले जाते. याचा व्यवसाय लाभदायी ठरू शकतो या साऱ्याचा त्याने खोलवर अभ्यास केला. त्यानंतर त्याने गीर गायींचे पालन करण्याचे ठरवले. या व्यवसायात उत्तम जोड देवून पशुपालन यशस्वी करुन दाखवले आहे.
पशुपालन हे यांच्या घराण्यात पूर्वापार चालत आलेले असल्याने लहानपणापासून याला गायी गुरांची आवड होती. गायींबद्दल या युवकाच्या मनात विशेष आस्था होती. शालेय शिक्षण घेत वाणिज्य शाखेतून पदवीधर झालेल्या विलासने नोकरीसाठी मुंबईचा रस्ता धरला. एका फायनान्स कंपनीत विलास हा नोकरी करु लागला. गावाकडे असणारी स्वमालकीची जमीन त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. गावाकडे येवून पशुपालन करावे आणि त्याला व्यवसायाची जोड द्यावी हा विचार त्याच्या मनात आला. नोकरी व्यवसायानिमित्त कोकणातील युवक मुंबई गाठतात मात्र विलासच्या मनात मुंबईहून परत गावाकडे येण्याचे विचार घोळत होता.
अखेर विलासने नोकरी सोडली आणि गावची वाट धरली. वडिल तुकाराम यांना विलासचा हा निर्णय धाडसाचा वाटला मात्र त्याच्यातील जिद्दीमुळे तो नक्कीच यामध्ये यशस्वी होइल , असा विश्वास व्यक्त करत त्याला सहकार्याचा हात दिला. गावी आल्यानंतर गोपालन करताना कोणत्या जातीच्या गायी आणायच्या यावर त्याने सखोल अभ्यास केला आणि तज्ञांचे मार्गदर्शन देखील घेतले. सर्वच दृष्टीने अत्यंत उपयुक्त असणाऱ्या गीर गायींचे पालन करायचे असा निर्णय विलास यांनी घेतला .
अमरेली गुजरात येथून सहा गीर गायी आणून त्यांनी गोपालनाची मुहूर्तमेढ रोवली . पत्नीसह घरातील सर्वांचेच विलास यांना सहकार्य मिळू लागले. संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी गवळीवाडी भाग हा अत्यंत दुर्गम आहे. या वाडीत जाण्यासाठी धड रस्ताही नाही. अशा ठिकाणी गीर गायी आणून दुग्धोत्पादन करणे हे नक्कीच धाडसाचे होते.
संगमेश्वर आणि देवरुख बाजारपेठ जवळ नसल्याने जाण्यायेण्यात दररोज खूप वेळ खर्च होणार होता. मात्र या सर्व अडीअडचणींना तोंड देण्याची तयारी विलासने ठेवली. एका गायी पासून ०३ ते १६ लिटर एवढे दूध मिळू लागले. एकूण ५० ते ६० लिटर दुधाचे संकलन होवू लागले आणि या दूधाला लिटरला ७० रुपये भावही मिळू लागला. गीर गायीच्या दूधाला जेवढे महत्व आहे तेवढेच तूपाला देखील असल्याने विलास यांनी पत्नी आणि आईच्या सहकार्याने तूप तयार करणे सुरु केले. या तूपाला चक्क किलोला २५०० रुपये दर मिळत आहे. महिन्याला साधारण १० किलो तूपाची आपण विक्री करत असल्याचे विलास मिरगल यांनी सांगितले .
दूध – तूप याबरोबरच शेण देखील खत म्हणून विकले जाते. गोमूत्राचा वापर विविध गोष्टीत होत असताना आपण गोमूत्रापासून फिनेल बनविण्याचे प्रयोग सुरु केले आणि ते यशस्वी देखील झाले. गीर गायींच्या मूत्रापासून तयार केलेल्या फिनेलला संगमेश्वर – देवरुख बाजारपेठेत मोठी मागणी असून त्याला चांगला दरही मिळत असल्याचे विलासने सांगितले.
सहा गीर गायींपासून दहा पाड्या झाल्याने लवकरच या व्यवसायाची आणखी वृध्दी होणार आहे. एक मोठा गीर जातीचा वळू देखील मिरगल यांनी पाळला आहे. गीर गायी गुजरातच्या असल्या तरी कोकणातील हवामान गीर गायींना चांगलेच मानवते त्यामुळे दूध देण्याच्या प्रक्रियेवर कोणताही विपरित परिणाम होत नाही. चांगली नोकरी सोडून गावाकडे येत पशुपालन करत त्याला व्यवसायाची उत्तम जोड देणाऱ्या विलास मिरगल यांचा आदर्श अन्य तरुणांनी घ्यावा असाच आहे.
नोकरी सोडून पशुपालन करत असल्याचा आपल्याला कोणताही पश्चात्ताप नसून आपण आणि आपले कुटूंब या व्यवसायात आनंदी असल्याचे विलास मिरगल सांगतो .